
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय उलथापालथीवर खुलेपणाने भाष्य केलं. फडणवीस यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री चेहऱ्याबाबतही महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
2024 च्या निवडणुकांना सामोरे जाताना मुख्यमंत्री चेहरा कोण असेल? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, आम्ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. आमच्याकडे हुकमी एक्का आहे. तो हुकमी एक्का म्हणजे मोदीजी. मोदींना समोर केलं की, तुम्ही कोणताही चेहरा द्या तो पुढे जातोच.
फडणवीस पुढं म्हणाले की, आज आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. निवडणुकीतही शिंदेच चेहरा असतील. आमच्या पक्षात एक संसदीय मंडळ आहे. हे मंडळच सर्व निर्णय घेतं. आम्ही सर्व त्याचे पालन करतो. पण काळजी करू नका 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असतील, असंही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, आमचा आणि शिंदेजींचा समन्वय खूप जुना आहे. महाराष्ट्रात आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आम्ही दोघेही एकमेकांना चांगले ओळखतो. मी उपमुख्यमंत्री आहे, असे त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही, असही फडणवीसांनी नमूद केलं.