
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
शिर्डी : मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली.
यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहऱ्यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरू आहे. यावेळी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार म्हणाले की, डॉक्टरांनी आपल्याला 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या 15 दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हटले की, शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांची भाषणे ऐकून घेतली आहेत. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल अशी आशा असल्याचेही त्यांनी म्हटले.
जाहीर सभेत, कार्यक्रमात सुमारे तासभर उभे राहून भाषण करणारे शरद पवार यांना आज आजारपणामुळे बसून भाषण करावे लागले. त्यांनी अवघी पाच मिनिटे भाषण करताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा आवाज क्षीण असल्याचे दिसून आले. त्यानंतर शरद पवार यांचे लिखित भाषण दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले.
आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी येथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. तर, शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणांच्या निनादात पवार यांचे स्वागत केले.
=====================
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ शिबिरासाठी सभागृहात प्रवेश करताच ‘देश नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..’ या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले.
========================