दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
———————————————- अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगूण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून अहोरात्र विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणारे वाडीकर गुरुजी यांचा आज सातवा स्मृतिदिन त्यानिमित्ताने घेतलेला हा त्यांच्या कार्याचा आढावा….
वाडीकर गुरूजीचा जन्म २९/४/१९३९ मध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर झाला.आपला समाज निरक्षर आहे या समाजाला साक्षर करावे, आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. म्हणून गुरुजींनी समाजामध्ये मिसळून राहुन लोकांना जागृत करण्याचे काम केले, त्यांच्या घरात कोणीही साक्षर नव्हते, आई-वडील सुद्धा निरक्षर होते, तरी गुरुजींनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, शिक्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्यामुळे
जे रंजले गांजले। त्याशी म्हणे जो आपले।।
तोच साधू ओळखावा ।देव तेथेची जाणावा ।।
या उक्तीची आठवण होते,
जीवन जगत असते वेळेस त्यांना अनेक अडचणी आल्या, तरीही ते आपल्या पेशावर जीवापाड प्रेम करून अध्यापन करत होते, पंचक्रोशी मध्ये त्यांचे नाव प्रतिष्ठित वाडीकर गुरुजी म्हणून उदयाला आले ,गावातील छोट्या मोठ्या प्रंसगामध्ये विशेष प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी ते जातीने हजर राहत होते, पांढरे शुभ्र धोतर आणि तीन बटनाचा शर्ट, गांधी टोपी हा त्यांचा पेहराव होता, मनाने ते अतिशय निर्मळ व निर्व्यसनी होते .
जगात चाललेल्या घडामोडी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगून देशावर प्रेम करण्यासाठी प्रेरणा देत होते,आज वाडीकर गुरुजीचे विद्यार्थी देशात, परदेशामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. वाडीकर गुरुजींनी स्वतःचे जीवन जगत असताना, इतरांच्या संसाराचा ही विचार करीत असत. सुसंगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो।। या श्लोकानुसार त्यांना संगत चांगल्या व्यक्तीची लाभली होती़ त्यांची सुरूवातीला खाजगी शाळेमध्ये लातूर येथे सहशिक्षक म्हणून नियुक्ती झाली, काही कालावधीनंतर जिल्हा परिषदच्या बोमनाळी, भातागंळी, किनी,येथे उपशिक्षक म्हणून आणि काटकळंबा येथे प्रभारी मुख्यध्यापक म्हणून कार्यरत झाले, त्यांची अध्यापन करण्याची शैली अतिशय सोपी, उत्कृष्ट आणि प्रत्येकाला समजण्यास सोपी होती. प्रत्येकाला सहज लक्षात येईल.अशा सोप्या भाषेत ज्ञानार्जन करत असत. नोकरी मिळाल्या नंतर पुढील शिक्षण थांबविले नाही तर त्यांनी अनंत अडचणीला तोंड देत देत शिक्षण शिकले. उच्च शिक्षण शिकण्याची परिस्थिती नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन त्या काळात एम .ए मराठीची पदविका प्राप्त केले ,त्यांच्या कठोर कडक व शिस्तप्रिय भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत शिस्त तर लागलीच, समाजात प्रमाणिकपणे वागून दुसऱ्यांच्या मदतीला कसे जाता येईल याची शिकवण गुरुजीं कडून आपोआप मिळाली, वाडीकर गुरूजींची आदर युक्त भीती आजही त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आहे,
शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्या साठी नसून शिक्षणामुळे स्वतःचे कुटुंब तर सुधारेलच त्यासोबत देशाला सुद्धा आपल्या कार्याची मदत होईल अशी शिकवण ते देत असत.
वाडीकर गुरुजी यांनी मागासवर्गीय वस्तीगृह चालू करून आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब असलेले विद्यार्थी यांना वस्तीगृहात प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मोलाचे योगदान दिले. वस्तीगृहामध्ये क्षमते पेक्षाही जास्त विद्यार्थीना प्रवेश देऊन त्यांचा अतिरिक्त आर्थिक भार स्वतःवर घेऊन त्यांना चांगले दर्जेदार अन्न व शिक्षण देण्यास मदत केले. वाडीकर गुरुजी यांना शिक्षण विस्तार अधिकारी या पदाची पदोन्नती मिळाली पण त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यात जास्त आनंद असल्यामुळे त्यांनी पदोन्नती नाकारली, विद्यार्थी हा समाजाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी अध्यापन केले, आणि
करी मनोरंजन जे मुलाचे। जडेल नाते प्रभूशी तयाचे ।। हे साक्षात विद्यार्थ्यांसमोर प्रकट केले,
विद्यार्थी घडविण्यातच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. वाडीकर गुरुजी यांचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे नावलौकिक करीत आहेत.
ग्रामीण भागात चालू घडामोडीची माहिती व्हावी पुस्तकाचे वाचन केल्यास ज्ञान वाढेल, ज्ञानाचे निरंजन तेवत ठेवण्यासाठी त्यांनी १९८२ साली छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय काटकळंबा व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय खैरकावाडी येथे सुरुवात केले. वाचनालयामुळे विद्यार्थ्यांची व समाजातील लोकांची बुद्धी विकसित होते, जिथं ज्ञान आहे तेथे मान आहे म्हणून ग्रंथ हेच आपले गुरु समजावे, अशा ग्रंथालयाची उभारणी गुरुजींनी केली, वाडीकर गुरुजी यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे, वडिलांचा वारसा जोपासत त्यांचे मुले श्री शामराव मारुतीराव शिरबरतळ सध्या अपंग निवासी कार्यशाळा मुखेड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत व रवीकिरण मारुतीराव शिरबरतळ श्री छत्रपती शाहू मतिमंद विद्यालय कंधार ,येथे हे सहशिक्षक असून वडिलांचा वारसा जोपासत आहेत,
तर एक मुलगा श्री उमाकांत मारुतीराव शिरबरतळ/ वाडीकर हे सरकारी वकील असून त्यांनी वडिलांनी दिलेल्या संस्काराचे धडे गिरवीत आहेत.तर नातू पवन गंगाधर शिरबरतळ यांनी G ,A कम्प्युटर MSCIT मुखेड येथे,संगणक क्षेत्राचे विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहेत.
असे हे साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचा वारसा जोपासलेले वाडीकर गुरुजी होते, वाडीकर गुरुजी यांनी वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्रित केले, वाडीकर गुरुजी व माझे वडील एकत्रित शिक्षण शिकले, दोघेही सरकारी नोकरीस लागले, आमच्या गावात सुरुवातीला हे दोघेच सरकारी नोकरीमध्ये होते आणि ते नात्याने मावळे भाचे होते पण मित्रत्वाचे अतूट बंधन आणि प्रत्येकाला सहकार्य करण्याचे दोघांची जिद्द हे त्या हे त्या दोघांमध्ये साम्य होते, मैत्री काय असते हे फक्त वाडीकर गुरूजी कडून शिकावी त्यांच्या जीवनावरील थोडक्यात दृष्टीक्षेप दिला आहे. शेवटी म्हणावे वाटते, सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता ।। चित्तास स्वस्थता।। जेंथे आहे।।१।। जेथे जागा धीर सदा हृदयांत।। सत्यवर्तनांत खर्ची घाला।।२।। पीडा दु:खे सोशी संकटे निवारी।। गांजल्यास तारी।। जगामाजीं।।३।। धीर धरून या सर्व सुख देती।। यशवंत होती ।।ज्योती म्हणे।।४।।
या अभंग रचना प्रमाणे गुरुजींनी सत्याची कास कधीही सोडली नाही,

वाडीकर गुरुजी यांच्या सातव्या पुण्यस्मरण निमित्त नामवंत कीर्तन कार ह.भ.प श्री दत्तात्रय महाराज भेंडेगावकर यांचे कीर्तन होणार आहे,
यांचा पंचक्रोशीतील सर्व भावीक भक्तानी लाभ घ्यावा,असे आवाहन विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता नांदेड, श्री उमाकांत वाडीकर यांनी केले आहे, त्यांना सर्व ग्रामस्थ खैरकावाडी (गोकुळवाडी) यांच्याकडून विनम्र अभिवादन

शब्दांकन
विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी. संस्थापक अध्यक्ष: प्रा. विठ्ठल बरसमवाड
