दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सातत्याने वादग्रस्त विधान करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांचं आणखी एक विधान भोवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची थेट विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तुलना करणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच महागात पडलं आहे. राज्यपालांच्या या विधानाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय पक्षांपासून ते सामाजिक संघटनांपर्यंत सर्वच वर्गातील लोकांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विधानवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज्यपालांचा निषेध म्हणून कुठे प्रतिकात्मक धोतर जाळलं जात आहे, तर कुठे त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले जात आहेत. तर कुठे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला जात आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत हेच चित्रं दिसत आहे.
इंदापूर तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज इंदापूर नगरपालिकेच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यानंतर सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने इंदापुर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.अखंड भारत देशाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केले असून त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.पदावरून हकालपट्टी न झाल्यास २७/११/२०२२ रोजी बाबा चौक इंदापूर येथे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नितीन शिंदे, संजय शिंदे,अमर गाडे,पवन घोगरे, महादेव सोमवंशी, संदीप पाटील,निवास शेळके, गफूरभाई सय्यद, हमीद आतार, सचिन इंगळे, प्रमोद देशमुख, प्रविण पवार, आश्रम पवार, हेमंत भोसले, संकेत माने, किशोर कदम, गणेश चोपडे, दत्तात्रय देवकर, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
