दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””“””””””””””””””””””””””””””
परभणी : शहरातील विविध शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या सेवारत शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून सुमारे ३११० रुपयांचा दंडही वसूल केला गेला आहे.
परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिसरात शुक्रवार व शनिवारी अशी दोन दिवस एका पथकाद्वारे ही मोहीम राबविण्यात आली आहे. सेवारत शासकीय सेवेतील जे कर्मचारी तंबाखूजन्य पदार्थ खाताना आढळून आले, अशा एकूण २५ जणांवर बजावण्यात आलेल्या कारवाईत रुपये तीन हजार एकशे दहा एवढा रोख रकमेतील दंड वसूल करण्यात आला आहे. अचानक राबवण्यात या कारवाईमुळे शासकीय कर्मचारी वर्गात पूरती खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.
या दंडात्मक कारवाईसाठी जे पथक तैनात करण्यात आले आहे त्यात डॉ. वडगीडवार, केशव गव्हाणे, अभिजित हेगडे, किशोर नंद आदींचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान अशाप्रकारच्या कारवाईत खंड न पडू देता, ती कायमस्वरुपी राबविली जावी अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे. पान, मावा, तंबाखूजन्य पदार्थ किंवा विडी, सिगारेटच्या नावाखाली कर्तव्यावरील हेच कर्मचारी कित्येक वेळा कार्यालयाबाहेर हॉटेल परिसर किंवा टपऱ्यांवर जात असतात. त्याशिवाय तासन् तास चिघळले जाणाऱ्या या पदार्थांना थुंकण्याच्या बहाण्याने हेच कर्मचारी वारंवार आपल्या जागा सोडून जी मिळेल ती खिडकी किंवा इमारतीमधील कोनाडे गाठून त्या जागा रंगी बेरंगी करतांना आढळून येत असते. त्यामुळे इमारतीचा तो परिसर, खिडक्या घाणीचे साम्राज्य बनले जाऊन रोगराईला धोक्याची निमंत्रण तर होतच असते शिवाय जनतेची विधायक कामे सुध्दा पूरती खोळंबली जातात. परिणामी दूरदूरहून येणारा शेतकरी व संबंधित नागरिक दिवसेंदिवस खोळंबले जातात यात शंकाच नाही. या नियोजित दंडात्मक कारवाईचा दंडात्मक बडगा खंडित न करता तो यापुढेही कायमस्वरुपी उगारला गेल्यास तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर आळा बसू शकेल, परिसर स्वच्छ राहिला जाईल शिवाय जनतेची ही कामे वेळेत उरकली जातील असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे. वरिष्ठांचे ही आदेश तत्परतेने पाळले जातील असे काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपले मत बोलून दाखवले.
