दैनिक चालू वार्ता नरखेड प्रतिनीधी – अतुल दंढारे
नरखेड: तालुक्यातील 22 ग्रामपंचायत निवडणुकीचे ढोल वाजायला लागले. सर्व ग्रामपंचायती करिता राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप व इतर पक्ष मोर्चे बांधणी करीत आहे. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचा असलेल्या जलालखेडा सर्कल मधील महत्वाची मेंढला ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडले आहे. या गटबाजीचे राष्ट्रवादी काँग्रेस समोर आव्हान निर्माण झाले आहे. या गटबाजीचा भाजप फायदा उचलण्याच्या तयारीत असून , रणनीती तयार करीत आहे. तर लगतच्या रामठी ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होईल असे चिन्ह आहे.
गेल्या काही दशकात मेंढला ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व राहिले आहे. पांच वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदाकरिता राष्ट्रवादीच्या उमेदवार स्व. वनिता मनोहर चरपे यांनी भाजपच्या प्रतिस्पर्धी दुर्गा सुभाष सातपुते यांच्या विरुद्ध एकतर्फी विजय संपादित केला होता. माजी पंचायत समिती सदस्य मनोहर चरपे यांच्या पत्नी स्व वनिता चरपे सरपंच तर नंदकिशोर चरपे यांची उपसरपंच पदी निवड झाली होती. गेल्या काही दिवसापासून मनोहर चरपे व उपसरपंच नंदकिशोर चरपे यांच्या मध्ये राजकीय मतभेद निर्माण झाले. याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट निर्माण झालेत . मनोहर चरपे हे बंडुपंत उमरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचा एक गट व उपसरपंच नंदकिशोर चरपे यांचा दुसरा गट निवडणुकीच्या मैदानात आमने सामने राहतील. राष्ट्रवादीकाँग्रेस मधील गटबाजी चा फायदा उचलण्याची रणनीती आखत भाजप निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहे.
मेंढला सरपंचपद सर्वसाधारण करिता असल्याने अनेक इच्छुक मैदानात उतरू शकतात. तीन वॉर्डामधून नऊ सदस्य व सरपंच पद अशी दहा जागांवर निवडणूक होणार आहे.
मेंढला लगत असलेली रामठी ग्रामपंचायात च्या तीन वॉर्डात सात सदस्य व सरपंच पदाकरिता निवडणूक होणार आहे. मेंढला पंचायत समिती गणातील रामठी हे महत्वाचे राजकीय केंद्र आहे. गेल्या पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांच्या विरुद्ध भाजप कडून मैदानात असलेले दिलेश ठाकरे यांचे हे गाव आहे. भाजप च्या कब्जात ग्रामपंचायत आहे . ती राष्ट्रवादीकडे खेचण्याकरिता मयूर उमरकर रणनीती आखत असल्याचे समजते. सरपंचपद अनुसूचित जाती स्त्री करिता राखीव आहे. निवडणुकीदरम्यान रामठी मध्ये राजकीय घमासान होईल असे चित्र आहे.
