
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
गझल चर्चेतून येत नाही. गझल ही प्रत्यक्ष देण्याची कला आहे. गझल हे सादरीकरण आहे. आणि गझल शास्त्र देखील आहे. जगण्यात असलियत असली तर गझलेत गझलियत आपोआप येते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी केले.
गझल मंथन साहित्य संस्थेच्या ‘गझलयात्री’ या पहिल्या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे प्रकाशन पुणे येथे करण्यात आले. याप्रसंगी गझलकार चव्हाण अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ गझलकार भूषण कटककर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ गझलकारा उर्मिला बांदिवडेकर, डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी म. भा. चव्हाण पुढे म्हणाले, की माणूस मनाने अत्यंत निर्भय हवा. जो माणूस निर्भय नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये. भीत भीत उजाडत नसते. क्षितिजावर सूर्य तुमच्या मर्जीने उगवत नसतो. गझल ही पार्ट टाईम विधा नाही. गझलसाठी ती मानसिकता असावी लागते. वृत्त यापेक्षाही वृत्ती महत्त्वाची आहे. मराठी गझल आणि उर्दू गझल या दोन संपूर्ण स्वतंत्र वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण उर्दू भाषा ही बैठी बोली आहे. आणि मराठी ही खडी बोली आहे. त्यामुळे या दोन्ही भाषांची संमेलने देखील वेगळी असणारच आहेत. उर्दू प्रमाणे मराठी असावी असा कोणीही हट्टाहास करू नये. गझल लिहिताना ज्याचे मन त्याला साक्षी असते. गझलियत ही वृत्ती आहे. गझल हे वृत्त नाही. गझलेचा आकृतीबंध जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रीतीभंग झाला तरी चालेल पण यतीभंग होऊ नये, असेही विनोदाने गझलकार म. भा. चव्हाण म्हणाले. भूषण कटककर यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन वैशाली माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष बा. ह. मगदूम, पुणे विभागीय सचिव प्रदीप तळेकर, उपाध्यक्षा डाॅ. विजया नवले, सचिव डॉ. रेखा देशमुख, सहसचिव नंदिनी काळे, कोषाध्यक्षा रेखा कुलकर्णी, संयोजक स्वाती लोहकरे, सरिता कलढोणे व जिल्हा कार्यकारिणीने परिश्रम घेतले.