
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाड्यातून विशेषतः नांदेड, परभणी येथून मुंबईला जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्या औचित्यावर दि. ४ व ५ डिसेंबर रोजी नांदेड येथून मुंबईसाठी एक विशेष रेल्वे परतीसह सोडण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर चळवळीचे नेते आशिष वाकोडे व अन्य कार्यकर्त्यांनी केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ही मागणी केली असून सदरचे निवेदन त्यांना पोहोचते करावे यासाठी परभणी जिल्हाधिकारी प्रशासकीय यंत्रणेकडे ते सुपूर्द करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधून महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे २२ रेल्वेगाड्या विविध कामांच्या निमित्ताने ज्या बंद करण्यात आल्या आहेत, त्या लवकरात लवकर सुरू केल्या जाव्यात जेणेकरुन सर्वांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेणे शक्य होईल. निवेदनावर सुमारे १०-१५ जणांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समजते.