दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : एक दुबळं, विकलांग आणि मानसिक दृष्ट्या अपंग सरकार या राज्यात बसलं आहे. या सरकारला पाठीचा कणा नाही. स्वाभिमान नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
तसेच, ‘आम्हाला सांगा कर्नाटकशी आम्हाला लढायचं आहे, त्यासाठी आम्ही आसामला नवस करायला चाललोय’, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राऊतांनी लगावला.
मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांना सीमाभागासंदर्भात काम दिलेले आहे. हे दोन मंत्री 3 तारखेला बेळगावांत जाणार आहेत. बेळगावात जाऊन ते काय करणार आहेत? आणि कोणाला भेटणार आहेत?. कन्नड वेदिके संघटनेचे कार्यकर्ते कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्रात येऊ शकत नाहीत. ते आपले झेंडे लावतात. हे महाराष्ट्राच्या सरकारमधील काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित येऊन याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करायला हवी”
