
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
२० कोटींच्या कामांचा शुभारंभ
जव्हार:-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि अतिदुर्ग भागात असलेला जव्हार तालुक्यात चार महिने पावसाळा संपला की अनेक गावपड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या शर्तीने पाणी आणावे लागत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.जीव धोक्यात घालून डोंगरदर्यातून पाणी आणताना जीवाला मुकावेही लागले आहे.या बाबींचा विचार करत पालघर जिल्हा परिषदेच्या कासटवाडी गटात जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे वीस कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गुलाबताई राऊत यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
जलजीवन मिशन योजनेतुन लोकसंख्येनुसार प्रत्येक घरात पुरेसे पिण्यायोग्य व वापराकरिता पाणी उपलब्ध होणार असल्याने पाण्यासाठी झालेल्या अनेक वर्षांच्या वनवासाला पूर्णविराम मिळणार असून जलजीवन मिशन योजनेतून अनेक गावांना पाणीपुरवठा होण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत चांभारशेत ५ कोटी,आकरे-५ कोटी,हाडे-१.५० कोटी,खरोंडा-३.५० कोटी,तिलोंडा-५ कोटी रुपयांची ही कामे असून महाराष्ट्र राज्य व केंद्रीय जलजीवन मिशन योजनेतून सुरवात झाली आहे.
केंद्र व राज्य शासनाने सुरु केलेल्या या जलजीवन मिशन योजनेतून हरघर पाणी योजनेचा लाभ हा गाव खेडोपाड्यातील चांभारशेत,आकरे,हाडे,खरोंडा व तिलोंडा ह्या सर्व गावांतील कुटुंबांना घरोघरी नळ कनेक्शन देवून घरा-घरात पाणी मिळणार आहे.या एकूण जवळपास वीस कोटींच्या कामांच्या उद्घाटना प्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गुलाबताई विनायक राऊत,जव्हार पं.स.समितीचे मा.उपसभापती
सीताराम पागी,मा.पंचायत समिती सदस्य विनायक राऊत,पंचायत समिती सदस्या- मिरा गावित,मंगला कान्हात, कासटवाडीचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत तसेच पिंपळशेत,चांभारशेत,तिलोंडा या ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच सुलोचना चौधरी,ग्रामपंचायतीचे सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.