
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, जिल्ह्यातील अनेक आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन ग्रामपंचायत आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील बिडकीन गावात रॅली काढत शिंदे गटाचे मंत्री भुमरे यांना आव्हान दिले होते. तर त्याच गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रॅली काढली होती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून आदित्य ठाकरे यांनी रॅली काढली तेथूनच मुख्यमंत्री यांची रॅली निघाली होती.आता याच गावात ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे याठिकाणी शिंदे गट विरोधात ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
तर याच बरोबर वैजापूर तालुक्यातील महालगावात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यावर ठाकरे गटाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप झाला होता. गेल्या महिन्यातच झालेल्या या राड्याची राज्यभरात चर्चा झाली होती. आता त्याच गावात आज ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या गावात देखील ठाकरे गट विरोशात शिंदे गट थेट सामना पाहायला मिळणार आहे.