
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मागील १५ दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली निवडणूकीची रणधुमाळी अखेर आजच्या निकालानंतर संपुष्टात आली आहे. पक्ष विरहित म्हणून संबोधले जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना सुध्दा आता राजकीय वलय प्राप्त होऊ लागल्याचे दिवसेंदिवस आढळून येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून त्या त्या पक्षांचे नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावून स्थानिक सत्ता आपल्या पक्षाच्या झेंड्याखाली कशी आणता येईल जणू याचाच प्रत्यय शर्थीने करीत असल्याचे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दिसून आले.
अठरा डिसेंबरला मतदान झाल्यानंतर आपले भविष्य मतपेटीत बंद असलेले उमेदवार आजच्या मतदानाकडे डोळ्यात तेल घालून बसले होते. थेट जनतेतून निवड होणारे सरपंच यांनीही पूर्ण ताकद लावून या निवडणुकीत आपले सर्वस्व पूरते पणाला लावले होते. आज उधळला जाणारा विजयाचा गुलाल कोणत्याही दगा फटक्याविना विरोधकांकडून हिरावून घेतला जाणार नाही यासाठी सदस्य व सरपंच पदासाठीचे उमेदवार, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांनी अगदी वैऱ्याची रात्र म्हणून बघितले जाते त्या मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मत मोजणी पर्यंत प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून जागता पहारा देणे स्वाभाविक होते. ज्यांनी आपल्या कार्यावर, सचोटीवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवला, त्यांच्याकडे विजयाची माळ चालून येणे स्वाभाविक होते तथापि ज्यांनी कधीही आपल्या कामावर विश्वास ठेवला नाही, जनतेच्या प्रति सचोटी ती काय असते, यांची जाणीव ठेवली नाही. केवळ आपल्या ताकदीचा वापर करुन व लक्ष्मी दर्शन देऊन मतांच्या आकडेवारीचा जुमला करण्यात प्रयत्न केला, त्यांना कदाचित मतदार राजांनी घरचा रस्ताही दाखवला असेल हे निवडणूक निकालानंतर कळून चुकले असेल यात शंकाच नसावी. असो, यांचा बोध पुढील काळात ते नक्कीच घेऊ शकतील असा भाबडा विश्वास बाळगायला मुळीच हरकत नसावी.
परभणी तालुक्यात सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अत्यंत चुरशीच्या लढाया झाल्या. एकाच पक्षाचे दोन दोन गट आमने सामने उभारुन आपले नशीब आजमावण्यसाठी अनेक ठिकाणी रिंगणात उतरले होते. तथापि काही उमेदवारांना विजयी करुन तर काहींना घरी बसवून विजयी करता आले असते परंतु मतदार सूज्ञ आहेत, त्यांनी तसे न करता पूर्ण गटालाच घरी बसवून नव्यांना सेवा करण्याची संधी देण्याचे महत्प्रयासी व पूण्यकाम याच मतदारांनी करुन दाखवले, हे सुध्दा काही कमी नाही. असे प्रकार कारेगाव, पिंपरी देशमुख व अन्य काही गावांतून झाल्याचे दिसून आले.
परभणी तालुक्यात अधिकांश ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्याकडेच ठेवत सत्तेसाठी आपसात सुंदोपसुंदी जरी केली असेल परंतु दुसऱ्याचा शिरकाव तेथे होऊ दिला नाही हे विशेष म्हणावे लागेल. कारेगाव येथे पूजा आप्पाराव वावरे, पिंपरी देशमुख येथे पूजा साधणे, कुंभकर्ण टाकळी येथे प्रभू जैस्वाल तर पिंगळी येथे अंगद अंबादास गरुड हे सरपंच पदाचे उमेदवार अटीतटीच्या लढतीत सेनेकडून विजयी झाले आहेत. त्याशिवाय अन्य काही ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा डौलाने कायम फडकावत ठेवला आहे. या निवडणुकीत खा.संजय जाधव आणि आ. डॉ. राहूल पाटील यांनी आपली पूर्ण सचोटी आपल्या कार्यातून जीवंत ठेवली असल्याचेच या विजयातून दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कुठेही यश आल्याचे ऐकिवात नाही. भाजपाने आसोला ग्रामपंचायत अटीतटीच्या लढतीत सेनेकडून खेचून घेतली आहे. राष्ट्रवादीने पेडगाव काबीज केले आहे. विजयी सर्वच ग्रामपंचायतींवर सर्वच राजकीय पक्ष आपला दावा सांगत असतात परंतु त्यांचं खरं इंगित मात्र मतदार आपल्या मतांमधून आयत्यावेळी दाखवत असतात, यांचे कोणालाही विस्मरण होता कामा नये. पराजय झालेल्यांनी पैशाचे वाटप न करता खरी लोकसेवा आणि क्षेत्रातील नागरी विकासकामे भविष्यात तरी इमाने इतबारे करावीत म्हणजे नक्कीच लाभ होऊ शकेल असा विश्वास बाळगायला मुळीच हरकत नसावी.