
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/जिंतूर : शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांचे फोटो मॉर्फ करुन बदनामी करण्याच्या हेतूने ते समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी जिंतूर पोलिसांनी जी उदासीनता दाखविली, ती अत्यंत निंदनीय अशीच आहे. त्याचाच परिपाक म्हणून सहायक पोलीस निरीक्षकांचे निलंबन तर व.पो.निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती समजते ती अशी की, जिंतूर शहरातील तहसील कार्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या काही महिला कर्मचारी यांचे फोटो मॉर्फ करुन बदनामी करण्याच्या हेतूने ते समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या आरोपींविरोधात जिंतूर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. पोलीस ठाण्यावर जाऊन याप्रकरणी आपण गुन्हे दाखल करावयास लावले तर त्यात आपलीच बदनामी होईल या भीतीने त्या कर्मचाऱ्यांनी ते टाळले होते. त्याचाच गैरफायदा घेत सदर आरोपींनी अन्य महिलांचे ही फोटो मॉर्फ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. किंबहुना हा प्रकार अधिक वाढीस लागला जाऊ नये यासाठीच गुन्हा दाखल करणे भाग पडले होते. या प्रकरणाची दखल घेऊन देशोन्नोती या दैनिक वृत्तपत्राने सततचा पाठपुरावा केला होता. जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी या प्रकरणातले गांभीर्य ध्यानी घेऊन अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करणे भाग पाडले होते. तथापि यातील लिप्त गुन्हेगारांना अटक करणे आवश्यक असतांना तसे न करता उलटपक्षी जिंतूर पोलिसांनी कमालीची उदासीनताच दाखविली होती.
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही परंतु काळ सोकावता कामा नये, ही धारणा ध्यानी घेऊन आमदार बोर्डीकर यांनी हे प्रकरण थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी जावी यासाठी सभागृहात आवाज उठवून न्यायाची मागणी केली होती.
जिंतूरच्या पोलिसांनी भविष्यात अशी कोणतीही उदासीनता दाखवू नये म्हणून याप्रकरणी लिप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नर्सिंग पोमनाळकर यांचे निलंबन तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांची अन्यत्र बदली केली असल्याचे निर्देश ना. फडणवीस सभागृहातील आ. बोर्डीकर यांच्या प्रश्नाला अनुसरुन दिले. अशा प्रकारची माहिती दस्तूरखुद्द आ. बोर्डीकर यांनीच दिल्याचे समजते. गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय शासन सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणारा आणि आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना तात्काळ गजाआड करण्यापेक्षा उदासीनतेच्या पडद्याआडून त्यांची पाठराखण करु पहाणाऱ्या जिंतूर पोलिसांवर केलेली कारवाई कठोरतेचा वचक बसला जावा अशीच म्हणावी लागेल यात शंकाच नाही.