
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : तालुक्याचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी भूमिगत गटारांची निर्मिती, तीन अग्निशमन केंद्रे, प्रगतीपथावरील नाट्यगृहासाठीचा उर्वरित निधी यासारख्या मागण्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लावून धरत शासनाचे लक्ष्य वेधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेत निधीचीही तरतूद तातडीने केली जाईल असे आश्वासन मिळविले. शहराचे व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिले जावे, यासाठी शहरात भूमिगत गटार योजना राबविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करुन लागणारा निधी तात्काळ मंजूर केला जावा, परभणी व सभोवतालच्या रसिक नागरिकांना मनोरंजनाचा लाभ घेता यावा यासाठी प्रगतीपथावरील नाट्यगृहासाठी सुमारे २१ कोटींचा निधी आवश्यक असून त्यालाही तातडीने चालना मिळावी, अग्निजन्य परिस्थिती तातडीने नियंत्रित करता यावी यासाठी शहरात आणखी तीन अग्निशमन केंद्र निर्मितीस मंजूरी देत बांधकामासाठीची तातडीने परवानगी व आवश्यक निधीची तरतूद करुन ते उपलब्ध केले जावे अशी मागणी आ.पाटील यांनी लावून धरली होती. राज्यात सत्तांतर झाले असले तरी शहराचा विकास हे केंद्रबिंदू ठरवून डॉ. पाटील यांनी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विकासात राजकारण आड आणले जाऊन विरोधकांना सापत्न भावाची वागणूक दिली जातेय याचा ठपका कोणी ठेवू नये, दुजा भाव, आकस घेतला जातोय असे चित्र निर्माण होता कामा नये याचा धोरणात्मक विचार करुन नगरविकास मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार केला जाईल व लागणाऱ्या निधीची सुध्दा तातडीने तरतूद केली जाईल असे सभागृहात अभिवचन दिले. तद्वतच आ.पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच भरीव असे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
शहराचे व नागरिकांचे आरोग्य निरोगी राखता यावे यासाठीचा हरित लवादाचा आदेश शिरसावंद्य मानून महापालिकेने राज्य सरकारकडे जो अहवाल पाठविला आहे, त्याच अनुषंगाने आ.पाटील यांनी पाठपुरावा लावून धरला आहे. भूमिगत गटार योजनेसाठी आवश्यक असा कृती आराखडा लवकरच तयार केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगून आ. पाटील व सभागृहाला आस्वस्त केले. तालुका व जिल्हा स्थान असूनही शहरात केवळ एकच अग्निशमन केंद्र सध्या कार्यरत आहे. दिवसेंदिवस वाढणारे नागरिकांत व विस्तारीकरण ध्यानी घेता आणिबाणीच्या कालावधीत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळाची गरज असलेल्या शहराच्या विविध भागात अन्य तीन अग्निशमन केंद्रांची नितांत गरज ध्यानी घेऊन आ. पाटील यांनी ही मागणी लावून धरली आहे. या प्रकरणीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी मुंबईतील सांताक्रूझ येथील अग्निशमन घ्या मुख्य कार्यालयात सादर केला असल्याने सरकारचे त्याकडे लक्ष वेधून घेतले. सन २०१८ मध्ये बांधकाम सुरु केलेल्या भव्य अशा नाट्यगृहाचे काम प्रगती पथावर आहे. यासाठी अगोदर १० लाख रुपयांची मंजूरी मिळाली आहे. तथापि अद्ययावत व सुसज्ज अशा निर्मितीमुळे शिवाय दिवसेंदिवस रॉ मटेरिअलच्या वाढत्या किमतीमुळे आणखी ११ लाख रुपये निधी अपेक्षित असल्याने तीही तरतूद तातडीने केली जावी जेणेकरुन लवकरात लवकर सदरचे नाट्यगृह लोकार्पण करणे शक्य होईल असे पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
परभणी महापालिकेबरोबरच अस्तित्वात आलेली वसई-विरार महापालिका परंतु ती अगदी सुचारु रुपाने कार्यरत आहे. तेथे कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा उल्लेखनीय व कौतुकास्पद अशाच राबविल्या जात आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह परदेशातील अनेक राष्ट्रांतील शिष्टमंडळांनी वसई-विरार महापालिकेला भेटी देऊन तेथील कामकाजाचे व कृती व्यवस्थापनाचे अनेकदा अवलोकन केले आहे. महापालिका मालकीचे व सार्वजनिक बांधकाम खाते निर्मिती अनेक रस्ते उल्लेखनीय असे आहेत. शहराची स्वच्छता, भूमिगत गटार योजना, महापालिका मालकीची परिवहन सेवा योजना, प्रतिवर्षी आयोजित भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा, विविध खेळांत प्राविण्य पारंगत, अष्टपैलू व नामांकित असे खेळाडू निर्माण करुन जागतिक स्तरावर पाठवणारी एकमेव अशी महापालिका म्हणून ख्याती मिळवलेली आणि भव्य दिव्य असा कला-क्रीडा महोत्सव साजरा करणारी वसई-विरार महापालिका म्हणून तिच्याकडे बघितले जाते. तेथे परभणी महापालिकेच्या शिष्टमंडळाने भेट दिली आणि तेथील कामकाजाचे वव्यवस्थापनाचे अवलोकन केले तर निश्चितच फलदायी ठरु शकेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदार, खासदार यांनीही भेट देऊन अवलोकन केल्यास उपयुक्त ठरु शकेल.