
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये लोकपयोगी कामांच्या सोबतच ग्रामीण भागातील जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात कशी आणता येईल या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या केशव सृष्टी या संस्थेच्या ग्रामविकास योजनेअंतर्गत माधव संस्कार केंद्राच्या माध्यमातून तुलसी दिनाचे औचित्य साधून जव्हार येथील दिव्य विद्यालयाच्या प्रणांगणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी असलेल्या कला व गुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रमिलाताई कोकड यांच्या उपस्थितीत भारत मातेच्या व भगवान बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये १४ माधव संस्कार केंद्रांनी सहभाग घेऊन जवळपास २०० मुलांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुण व कौशल्य दाखवून दिले.या स्पर्धेमध्ये लंगडी,खो-खो,रीले व बटाटा शर्यत यासारख्या खेळांचा समावेश केला गेला होता.अनुक्रमे खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक खुदेड तर द्वितीय क्रमांक दापटी,लंगडीमध्ये रामनगर व जयेश्वर,बटाटा स्पर्धेत वाकीचामाळ व रामनगर तर रिलेमध्ये जयेश्वर आणि वाकीचामाळ या माधव संस्कार केंद्रांनी विजय संपादन केला.सर्व विजयी संघांना केशव सृष्टी संस्थेच्या ग्राम विकासाच्या प्रमुख अनिता कुलकर्णी तसेच ग्रामविकास जव्हार केंद्राचे प्रमुख कैलास कुरकुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन विजय संघाचा सत्कार करण्यात आला.