
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-महाराष्ट्रातील सेतु संचालक यांचे रास्त प्रश्न निकाली काढण्याबाबत अमरावती जिल्हा सेतू संचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वानरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षवेधी सादर केली.
महाराष्ट्र राज्यात सेतु संचालक यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला राज्यशासनाचे विविध सेवा व सुविधा तसेच शासकीय योजना ग्रामीण व शहरी भागात ऑनलाईन पध्दतीने पोहचविण्याचे कार्य सेतु संचालक मागील १५ वर्षापासुन करीत आहेत.तसेच सर्वशासकीय यंत्रणेसोबत जनतेला उत्तम सेवा व सुविधा देत आहेत.अश्यातच सेतु संचालक जनतेला देत असलेल्या सेवा सुविधांचे दर शासनाने १५ वर्षापूर्वी मंजुर केलेले आहे.या १५ वर्षात प्रत्येक गोष्टीचे दर ५ ते १० पटीने वाढलेले असल्यामुळे (उदा.कागदाचे दर प्रती रिम १०५ रू. एवढे होते आता ते दर रूपये ३५०/- ) तसेच टोनर,इलेक्ट्रीक बिल,संगणक व प्रिंटर इ.परंतु शासनाने सेतु सुविधा यांचे दर मागील १५ वर्षापासून वाढविलेले नाही.त्यामुळे सेतु संचालक आर्थीक अडचणीत असून बरेच सेतु केंद्र बंद पडलेले असुन उर्वरीत केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे शासनाने अत्यंत चांगल्या उद्देशाने चालु केलेली ही यंत्रणा मोडकळीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे महाराष्ट्र सेतू केंद्र संघटना अमरावती जिल्हा पदाधिकाऱ्यांनी यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करताना म्हटले.
तरी १५ वर्षातील महागाई निर्देशांक लक्षात घेवुन सेतु सुविधा यांचे दर तात्काळ वाढविण्यात यावे आणि सेतु संचालक यांचा जनतेशी रोजच्या रोज येणाऱ्या संपर्कामुळे व संगणक आज्ञावली आणि इतर अडचणीमुळे जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते.बरेचदा अटीतटीचा सामना करावा लागतो.त्यामुळे सेतु संचालक यांना विमा सुरक्षा देण्यात यावी.सेतु पोर्टलवर ऑनलाईन काम करीत असतांना येणाऱ्या तांत्रीक उणीवांचे तात्काळ निवारण करावे जेणे करून जनतेला अतीशय उत्कृष्टपणे सेवा देता येईल.या सर्व मागण्या रास्त मागण्या तात्काळ मान्य करून तसा शासन आदेश काढण्यात यावा याकरिता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्षवेधी निवेदन सादर करून अमरावती जिल्हा सेतु संचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्र्यांसोबत चर्चा करून मागण्यांची स्पष्टता करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य सेतू संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष संजय वानरे,सचिव मनीष चौधरी,सुनील लखपती,जयंत शिळनकर,उमेंद्र गीद,निलेश भटकर,सुमित मनोहरे,अमोल बारघडे,सचिन लांडे,रोहित पांडे आकाश काकडे,संजय दिवाण,सुदर्शन यावले,अब्दुल शफिक शेख,महेश जगताप,महिला सहसंघटक प्रमुख सौ.रुपाली सुहास ठाकरे,सौ.अनुराधा खारोडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.