
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:- गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचे जव्हार तालुक्यातील नांगरमोडा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या निवासी शिबिरात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पत्रकार मनोज कामडी यांनी ग्रामीण आणि शहरी पत्रकारिता तसेच पत्रकारितेतील संधी व आव्हाने या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये विविध कोर्स व लागणारी शैक्षणिक पात्रता याविषयी माहिती देऊन या क्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे असणारे लेखनाचे कौशल्य व वाचनाची आवड असणे गरजेचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी कामडी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो नेहमी जनतेच्या प्रश्नांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवणारा असला पाहिजे.ग्रामीण पत्रकारिता,पत्रकाराला निर्माण होणाऱ्या अडचणी व आपल्याला आलेले अनुभव त्याचप्रमाणे येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना याविषयी माहिती देऊन एक पत्रकार हा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात वावरणे गरजेचे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेत विविध विषय हाती घेऊन या शिबिरात महाविद्यालयातील १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग असून शिबिरात सकारात्मक विचार,ग्रामीण भागात वाढलेली व्यसनाधीनता,दारूबंदी,अंधश्रद्धा निर्मूलन,आधुनिक शिक्षण,आरोग्याची काळजी व स्वच्छता अभियान यासारख्या विषयावर पथनाट्य व नाटीकांचे सादरीकरण करून ग्रामीण भागात जनजागृतीचे काम या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी करीत आहेत.या शिबिरामध्ये महाविद्यालयाचे मा.उपप्राचार्य प्रा.अनिल पाटील,मच्छिंद्र वाघचौरे,कार्यक्रम अधिकारी डॉ.अविनाश अडसूळ महाविद्यालयाचे प्राध्यापक अनंत आवळे,मंगेश भले,सुधीर भोईर,प्रवीण नडगे व ऋतुजा पाटील उपस्थित होते.