दैनिक चालु वार्ता मलकापूर प्रतिनिधी:- सध्या प्लास्टिक कचरा ही आपल्यासमोरील एक खूप मोठी समस्या आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग व इतर प्लास्टिक पर्यावरणासाठी खूप घातक आहे. हे प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नसल्याने ते वर्षानुवर्षी तसेच राहते व यामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात . या प्लास्टिकचा वापर आपण पूर्णतः बंद करू शकत नाही परंतु याची योग्य विल्हेवाट लावून आपण याचे दुष्परिणाम बरेच अंशी कमी करू शकतो .अशा प्लॅस्टिकची योग्य विल्हेवाट लावण्यासाठीच्या काही उपायांपैकी एक म्हणजे ‘इको ब्रिक्स’ इको ब्रिक्स म्हणजे काय आणि इको ब्रिक्स कशा बनवायच्या हे लोकांना माहिती होण्यासाठी जागर फाउंडेशनच्या वतीने मलकापूर परिसरामध्ये ईको ब्रिक्सच्या माहितीचे पत्रक वाटण्यात आली. आपणही आपल्या घरातील प्लास्टिक कचरा, जसे प्लास्टिकच्या कॅरीबॅग्स, प्लास्टिकचे रॅपर्स इतरत्र न फेकता रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून इको ब्रिक्स बनवा, जेणेकरून प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्या जाईल.अधिक माहितीसाठी Jagar multipurpose foundation या यूट्यूब चैनल ला भेट द्या. सर्वांनी आपापल्या घरी इको ब्रिक्स बनवून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जागर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ नितीन बऱ्हाटे यांनी केले.


