दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी शहरानजीकच अंतरावर असलेल्या शिरजगाव येथील सागर बोबडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला तीन जणांनी लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना ८ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथून प्राप्त झाली.
सदर प्रकरण असे की,रवी रोही हे सागर बोबडे यांच्या शेतात मजूर म्हणून कामाला असतात.त्यांच्या शेतात कापूस वेचत असताना काही मेंढपाळ त्यांचे शेतात मेंढरे घेऊन जात होते.काहीही कारण नसताना त्यावेळी वैभव शेरकर व नवनीत शेरकर यांच्या मदतीने शेजारील शेतमालक देवा अशोक शेरकर याने त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने रवी रोही यांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून तिघेही जण पळून गेले.जखमी अवस्थेत असलेल्या रवी याने कसाबसा त्यांच्या भावाला आणि मित्रांना फोन केला व घटनास्थळी बोलावून घेतले.जखमी अवस्थेत असलेल्या रवी यांना बघून भाऊ व मित्रांनी तात्काळ अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय गाठले असता प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णाच्या डोक्याला जबर मार असल्याकारणाने अमरावती येथे रेफर करण्यास सांगितले आणि जिल्हा रुग्णालय अमरावती येथे उपचार करून घरी परत आल्यावर फिर्यादी रवी रोही यांच्या जबानी वरून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे आरोपी देवा अशोक शेरकर यांचा चुलत भाऊ वैभव शेरकर नवनीत शेरकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलीसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३२४,५०४,५०६ व ३४ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक अनिल कविटकर करीत आहेत.


