
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत,असे निर्देश निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी आज येथे दिले.
निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षक श्री.पंकजकुमार यांचे आज आगमन झाले.त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवडणूक प्रशासनाची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला,तसेच विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी पवनीत कौर,उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन, उपायुक्त संजय पवार,अजय लहाने,गजेंद्र बावणे,विजय भाकरे आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आलेली पूर्वतयारी,मतदान केंद्रे,मतमोजणी केंद्र,आदर्श आचारसंहिता कक्ष,माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती,प्रशिक्षण कार्यक्रम आदी विविध बाबींची माहिती निवडणूक निरीक्षकांनी घेतली.आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही व्हावी,असे निर्देश त्यांनी दिले.नियोजित मतदान केंद्रांच्या अनुषंगाने शहरातील गणेशदास राठी विद्यालय,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विविध स्थळांची पाहणी निवडणूक निरीक्षक श्री.पंकजकुमार यांनी केली.
बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे,सहायक आयुक्त विवेकानंद काळकर,तहसीलदार वैशाली पाथरे,निकिता जावरकर,संतोष काकडे,रवी महाले,निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त विजय शिखरे आदी उपस्थित होते.