
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील वीरभद्र शिक्षण संख्या संचलित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांनी मशाल रँलीचे भव्य दिव्य स्वागत आयोजित केले होते . स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने ” आजादी की मशाल यात्रा ” काढण्यात येत आहे . ही यात्रा दि.25 रोजी भव्य मशाल यात्रा शहरातील बारहाळी नाका ते महात्मा फुले महाविद्यालय संकुलात अतिशय उत्साहात आगमन झाले .
या मशाल यात्रेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे तर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , मशाल रँलीचे समन्वयक देगलूर महाविद्यालय , देगलूरचे लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ. बालाजी कत्तुरवार , वै.धुंडा महाराज महाविद्यालय , देगलूरचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अभिमन्यु पाटील , लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय , धर्माबादचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.संभाजी मनुरकर तसेच व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे यांची विशेष उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय समन्वयक तथा कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे यांनी केले . स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची ओळख व प्रेरणा देण्यासाठी चित्र प्रदर्शन मांडण्यात आले होते .
नांदेड येथील विद्यापीठ ज्या महामानवाच्या नावाने ओळखले जाते असे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात या मशाल रँलीचे स्वागत केले . सर्व उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयीन परंपरेने आणि भारतीय संस्कृतीने सत्कार करण्यात आले . विद्यापीठाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रँलीचे उद्देश व भूमिका अतिशय सखोल पद्धतीने डॉ. मनुरकर व्यक्त करताना सांगितले की , भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा प्रसंगाचे चिरस्मरण येणाऱ्या पिढीला करून देण्यासाठी विद्यापीठाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे . महाविद्यालयाकडून झालेल्या स्वागताने आम्ही भारावून गेलो आहेत . ते सर्व कुशल नेतृत्वानेच शक्य आहे . समाजात आपल्या सारखे आपलेपणा जपणारे महाविद्यालय असणे आवश्यक आहेत असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले . अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे यांनी विद्यापीठाकडून मिळालेली संधी खुप मोलाची आहे . इतिहासात सुवर्णाक्षरांनी या रँलीची नोंद निश्चितच होणार आहे . यथोचित सत्कार स्विकारल्याबद्ल मनस्वी आनंद होतो आहे . स्वयंसेवक व समन्वयकांचा सत्कार करण्याचे आम्हाला भाग्य लाभले .सर्व वीर शहीद आत्म्यांचे सदैव स्मरण करत रहावे असे विचार व्यक्त केले . उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवसाची व आयोजित रँलीविषयी सुध्दा शपथ डॉ. कत्तुरवार यांच्याकडून देण्यात आली . कार्यक्रमाची सांगता इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रसाद जोशी यांच्या राष्ट्रगीतांनी करण्यात आली .