
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : रुपये दहा हजारांच्या लाच प्रकरणात लिप्त पोलीस अधिकाऱ्याच्या त्या कृतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केले आहे. या बाबत नुकताच आदेश काढण्यात आला आहे.
सूर्यकांत राऊत हे पाथरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी मारहाण प्रकरणीच्या एका गुन्ह्यात आरोपीस नोटीसवर सोडणे, जामीन मिळवून देणे तथा गुन्ह्यांच्या तपासात सहकार्य करणे यासाठी रुपये वीस हजारांची मागणी केली होती. त्यापैकी तडजोड होऊन रुपये दहा हजारांची रक्कम स्वीकारताना परभणीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत राऊत यास रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शासन सेवेत कर्तव्य बजावताना सपोउपनि सूर्यकांत राऊत यांनी लाच स्वीकारण्याचे कृत्य केल्यामुळे संबंध पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका राऊत यांच्यावर ठेवण्यात आला होता ज्यामुळे त्यांना निलंबित करणे भाग पडले गेले. नुकताच या प्रकरणीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी दिली आहे.
निलंबन कालावधीत सूर्यकांत राऊत यांना जिल्हा पोलीस मुख्यालय येथेच कार्यरत राहावे लागणार आहे. एकूणच काय तर लोभ हा अत्यंत वाईट असतो. याच लोभाला बळी पडून राऊत यांच्या शासकीय सेवेला कायमचा धब्बा लागला गेला आहे. शासन सेवेत असताना इमाने इतबारे कर्तव्य बजावणे क्रमप्राप्त असते परंतु लोभाचा हव्यास कधी, कुठं घेऊन जाईल याचा नेम नसतो किंबहुना तशीच दयनीय अवस्था लाच स्वीकारण्याच्या कृत्यामुळे झाल्याने राऊत यांच्यावर ही परिस्थिती ओढावली गेली आहे. त्यांचे प्रायश्चित्त हे भोगावेच लागणार आहे एवढे नक्की.