
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : कृषी सेवा मुख्य अभ्यासक्रमात करण्यात आलेला बदल तात्काळ रद्द केला जावा अन्यथा आंदोलनाचा भडका अधिक तीव्र होऊ शकेल असा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दिला आहे. सुमारे २०० विद्यार्थी मागील पांच दिवसांपासून कुलगुरुंच्या दालनासमोर आंदोलन करीत आहेत.
कृषी सेवा मुख्य परिक्षा- २१-२२ ला तात्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्ववत करावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे, मृदा व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती केली जावी, महाराष्ट्र राज्य सेवा २०२३ मुख्य परिक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा आदी मागण्यांविषयी घोषणा करुन सदर विद्यार्थ्यांनी परिसर पूरता दणाणून सोडला आहे. इतकंच नाही तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा भडका अधिक तीव्र केला जाईल असाही इशारा दिला आहे.
राज्य लोकसेवा आयोगामार्फत नवीन पदभरती साठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्या जाहिरातीच्या अनुषंगाने समाविष्ट नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांवर कमालीचा अन्याय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सदरचे धोरण रद्द करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मागील २५ जानेवारी पासून आंदोलन छेडले आहे. सुमारे दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परिक्षेत सन २०१६ पर्यंत कृषी अभियांत्रिकी साठी ४०० गुण होते. २०१७ मध्ये तेच गुण २०० वर आणले तर २०२२ मध्ये ते गुण १६ इतके कमी करुन विद्यार्थ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही प्रणाली रद्द करुन सर्वांना समान संधी उपलब्ध होईल अशी कृती करावी अशी मागणी लावून धरली आहे.
याशिवाय सदर आंदोलक विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या विशेषत्वाने लावून धरल्या आहेत, त्यात कृषी सेवा मुख्य परिक्षा-२१-२२ ला तात्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्ववत करावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यात यावे, मृदा व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती केली जावी, महाराष्ट्र राज्य सेवा २०२३ मुख्य परिक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा आदी मागण्या आहेत. सदरहू मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करु असा निर्वाणीचा इशारा सुध्दा दिला आहे. एकूणच विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पाहून प्रशासन नेमकी काय भूमिका घेऊ शकेल, हे आगामी काळात दिसून येणारच आहे.