
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी आज झालेल्या निवडणूकीत परभणी जिल्ह्यात एकूण ४ हजार ५५८ एवढे मतदान झाले आहे. त्यापैकी ३८६७ पुरुष तर ७०१ महिला शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. झालेल्या मतदानाची टक्केवारी ९०.१७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला झालेली सुरुवात थंडी असल्याने सुरुवातीला कांहींशी संथ गतीने होती परंतु कालांतराने त्यात चांगलीच वाढ होताना गर्दीमुळे दिसून आली. परभणी जिल्ह्यात एकूण ४ हजार ७१८ एवढे मतदान होते.
औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदार संघात एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. ते या निवडणूकीत जोमाने आपले नशीब आजमावत असले तरी खरी चुरस राष्ट्रवादी व भाजपा मध्येच असल्याचे दिसून येत आहे. या अटीतटीच्या लढाईत नेमकी कोण बाजी मारुन पुढे सरसावतो हे आगामी दोन तारखेलाच स्पष्ट होणार आहे. परभणी जिल्ह्यात एकूण १८ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली जावी यासाठीचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परभणी जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले जावे यासाठी अनेक राजकीय पक्षांचे नेते, शिक्षक संघटना आदींनी सकाळपासूनच मेहनत घेतली होती. प्रत्येक उमेदवारांनी विशेषतः राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी त्या मतदान केंद्रांबाहेर मंडप थाटून आपले कार्यकर्ते कार्यरत ठेवले होते ज्यामुळे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवत यादीतील क्रमांक व बुथ क्रमांक मतदारांना वेळेवर उपलब्ध होऊ शकले. निवडणूक यंत्रणेने सुध्दा प्रशासकीय कामात योग्य ती खबरदारी घेतली होती. त्याशिवाय केंद्र किंवा परिसरात कोणतीही गडबड होऊन कायदा व सुव्यवस्था ढासळली जाणार नाही यासाठीची पूर्ण खबरदारी पोलीस प्रशासनानेही घेतली होती. कार्यरत सर्वच यंत्रणांनी मतदान पेट्या औरंगाबाद येथील नियोजित सुरक्षित ठिकाणी जाईपर्यंत त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणून योग्य ती खबरदारी घेतली असल्याचे दिसून आले.