
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरापासून ७ कि.मी. अंतरावरील त्रिधारा येथील एका गट्टू कारखान्याला मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. आगीचे वृत्त समजताच परभणी व पूर्णा येथील अग्निशमन दलाच्या यंत्रणेद्वारा अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याचे समजते. तथापि याप्रसंगी सुदैवाने मानवीय हानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.
सचिन सोमाणी यांच्या मालकीचा ओंकारेश्वर नावाचा गट्टू कारखाना त्रिधारा येथे कार्यरत आहे. आगीचे नेमके कारण काय, हे जरी समजले नसले तरी ती शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर आगीची माहिती परभणी महापालिका व पूर्णा नगरपरिषदेला देण्यात येताच आगीचे गांभीर्य ध्यानी घेऊन अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी रवाना झाले. तथापि रात्रीची सुमसान वेळ आणि हवेचा वाढता जोर पहाता आगीने बघता बघता रौद्र रुप धारण केले. दहा बंबमधील पाण्याचा जोरकस मारा तैनात ठेवून परभणी येथील दोन व पूर्णा येथील एका नियंत्रण वाहनाद्वारे आगीवर चतुरस्त्र नियंत्रण ठेवताना आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे पाच तासांचा वेळ कमालपूर्व महत्प्रयासी ठरला गेला, असं म्हटलं तर चुकीचे ठरु नये. दुर्दैवाने यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी दैवं बलवत्तर म्हणून कोणतीही मानवीय हानी झाली नाही.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन जीवाची बाजी लावली, त्यात परभणी महापालिका अग्निशमन दलाचे अधिकारी डी.बी. कानोडे, निखिल बेंडसुरे, सय्यद नाजीन, मदन जाधव, रोहित गायकवाड, गौरव देशमुख, सय्यद इनायत आली, संतोष मुदीराज आदींचा प्रामुख्याने यात समावेश होता.