दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली, चंदननगर. दि.5 वाढत्या उन्हामुळे निष्पर्ण होत चाललेली झाडे-झुडुपे ,त्यातच उन्हाळ्यात आटत चाललेला पाणीसाठा यामुळे पक्ष्यांना जगण्यासाठी फारच कसरत करावी लागत आहे.त्यातच मागच्या काही दिवसांत बरेच पक्षी बेशुद्ध झाल्याच्या घटनासुद्धा आपल्याला पाहायला मिळतील कारण अन्न आणि पाण्याच्या शोधात असताना ते जर लवकर मिळालं नाही तर उन्हाच्या कडाक्यामुळे पक्ष्यांनासुद्धा भोवळ येते.
त्यामुळे अशा मुक्या जीवांची होत असलेली ससेहोलपट थांबवून त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी विद्यार्थी काँग्रेसचे ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संकेत गलांडे यांनी वडगाव शेरी,विमान नगर या भागातील उद्यानांमध्ये बर्ड फीडर बसविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.आज सकाळी बॉम्बे सॅपर्स गार्डन आणि सोमनाथ नगर येथे बसविलेल्या बर्ड फीडरचे उदघाटन ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तिथे उपस्थित नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना उन्हाळ्यात आपण सर्वांनी पक्षीमित्र बनून,पक्ष्यांच्या अन्नाची आणि पाण्याची सोय करणं गरजेचं आहे,असं आवाहन संकेत गलांडे यांनी केलं. यावेळी श्रीरंग लंघे,पंडित पिंगळे ,अजय गलांडे,संतोष काळे,गंगाधर हिटनळी, बाबासाहेब पाटील, प्रतीक झुरुंगे सिद्धार्थ नरवडे तसेच ब्रह्मचैतन्य हास्ययोग मधील सर्व ज्येष्ठ नागरिक व बॉम्बे सॅपर्स कॉलनी मधील सर्व सभासद उपस्थित होते.
