
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका शेतकऱ्याचा कर्ज वसुली प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून या बाबत तात्काळ चौकशीचे दिले असून वेळ पडलास व्यवस्थापकाविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
याबाबत माहिती अशी की,अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी रमेश सावरकर यांच्या जवळ अडीच एकर शेती असून सन २०१६ मध्ये त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे ९५ हजार रुपये कर्ज घेतले होते.२०१९ च्या कर्जमाफी साठी पात्र यादीत त्यांचे नाव असताना सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाने त्यांच्याकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला होता.अंजनगाव लोक न्यायालयात बँक ऑफ महाराष्ट्र सदर प्रकरण दाखल करून त्यांना नोटीस दिली होती.७२ हजार रुपयात तुमचे सेटलमेंट करण्यात आल्याचे बँक व्यवस्थापकाने सदर कास्तकारला सांगितल्यानंतरही बँक व्यवस्थापकाने सदर कास्तकाराची दोन लाख रुपयाची फिक्स डिपॉझिट मधील १ लाख ८१ हजार रुपये कर्ज खात्यात परस्पर भरून घेतल्याने सदर कास्तकार दि.१० मे २०२३ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आत्महत्या करण्यास गेले होते.या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी घेतली असून याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.चौकशी होताच बँक ऑफ महाराष्ट्राचा अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आज अमरावती येथे पत्रकारांना सांगितले.
सदर प्रकरणाची रीतसर तक्रार लखाड येथील शेतकरी रमेश सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.सदर प्रकरणात आता बँक अधिकाऱ्यावर काय कारवाई होते की नाही याकडे अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.बँक ऑफ महाराष्ट्र च्या या व्यवस्थापकाविरुद्ध अलीकडे अनेक तक्रारी वाढल्या असून परंतु बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी मात्र;याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमध्ये केल्या जात आहे.
.आणि जिल्हाधिकारी गहिवरल्या
• गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात रमेश सावरकर या अल्पभूधारक शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्रने अन्यायकारक केलेल्या कर्ज वसुलीची तसेच बँकेसमोर आत्महत्या करीत असल्याचे सांगताच जिल्हाधिकारी दोन मिनिट स्तब्ध होऊन अक्षरशः गहिवरल्या आणि शेतकऱ्याला तुम्ही असे करू नका,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,असा धीर देऊन बँकेच्या चौकशीचे तत्काळ आदेश दिले.