
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम – वसंत खडसे
वाशिम : जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जवळपास देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या व न्याय मागणीचा सरकारने सहानुभूतीने विचार करून त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील. असे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केले आहे.
सन २००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेवरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी दिनांक ३ मे२०२३ पासून आंदोलन उभारले आहे. सदर आंदोलनाला अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी उपस्थित सर्व आंदोलकांना संबोधित करताना आमदार सरनाईक बोलत होते. पुढे बोलताना; ते म्हणाले २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा हा संविधानिक अधिकार आहे. इतर कुठल्याही शासकीय विभागांमध्ये अनुदान हा प्रकार नसून त्या सर्व विभागातील २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. तथापि शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ न मिळणे हा सदर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय आहे. शासनाने हा अन्याय तत्पर्तने दूर करावा यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. याआधी सुद्धा शासनाच्या विविध अधिवेशना दरम्यान जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात प्रभावीपणे मांडला आहे. आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी माझी लढाई सुरूच राहील. असे मत आमदार सरनाईक यांनी व्यक्त केले. यावेळी माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत, पेन्शन आंदोलनाचे पदाधिकारी श्री सुनील भोर यांच्यासह शेकडो शिक्षक बंधू,भगिनी उपस्थित होते.