
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
प्रत्येक बाबीचे (शोधाचे) फायदे तोटे असतातच, पण मानवी जीवनावर त्याचे काय दुरगामी परिणाम होतात याचाही विचार करावा लागेल.
सध्याचा काळ हा संगणकाचा आहे. आपण प्रगतीच्या अशा टप्यावर आहोत की इथून याच गतीने पुढे जायचे की खाली कोसळायचे हे आपल्या कुशलतेवर अवलंबून आहे. म्हणून हे तंत्रज्ञान पेलण्यासाठी कुशल नागरीक बनवणे हे महत्वाचे आहे. ना की तंत्रज्ञानाला दोष देणे. कारण याच सुजाण नागरिकत्वावर जगाच्या प्रगतीचा वेग कायम राहणार आहे.
काय आहे ए. आय . ? आज सर्वत्र चॅट जी पी टी चा बोलबाला आहे . चॅट जीपीटी चा फुल फॉर्म जनरेटिव्ह प्री ट्रेनड ट्रान्स्फॉर्मर . हा एक भाषा तंत्र आहे जे मानवी भाषा समजण्यासाठीचा ए. आय . अल्गोरिदम आहे.ए.आय. म्हणजे अर्टिफिशिअल इंटेलिजिअंट शुद्ध मराठीत कृत्रिम बुध्दिमत्ता. जेफ्री हिंटन यांनी या क्षेत्रात खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या संशोधनानुसार ए.आय. प्रणालीमध्ये न्यूरल नेटवर्क ही अशी प्रणाली आहे जी माहिती शिकण्याच्या आणि प्रक्रिया करण्याच्या पद्धतीमध्ये मानवी मेंदुसारखी काम करत असते. त्यामूळे मानवी मेंदुप्रमाणे अनुभवातून शिकण्यासाठी ही प्रणाली सक्षम ठरू शकते. याला डीप लर्निंग म्हणतात . त्यामुळे भविष्यात ही प्रणाली मानवी मेंदूपेक्षा अधिक सरस ठरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आणि थोड्याबहुत प्रमाणात आपणही तो अनुभवत आहोत.
आजच महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ए.आय. तंत्रज्ञानाने सुसज्ज असे वेग नियमन करणारे वाहन चार जिल्ह्यांना पुरवले आहे. हे वाहन तीन कि.मी. इतक्या अंतरावरील वाहनाचा वेग मोजू शकते, तीनशे मीटर इतक्या अंतरावरील वाहनाचा नंबर , सुस्पष्ट फोटो, चालकाने हेल्मेट अथवा सिटबेल्ट लावला आहे की नाही एवढेच नाही तर वाहनाच्या काचाची फिल्म किती काळी आहे याचीपण तपासणी करू शकणार आहे. जे काम एका ट्रॅफिक हवालदाराला शक्य नाही ते काम या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज शक्य आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यात आपल्याकडे मनुष्यबळाची सहज उपलब्धता असताना सुद्धा त्याची गरजच पडणार नाही आणि हाच खरा धोका आपल्यापुढे आहे.
अशी काही क्षेत्र आहेत भविष्यकाळात यात मनुष्यबळाची आवश्यकताच राहणार नाही. उदा. सर्वेक्षण करणारे क्षेत्र, इन्टरप्रिटर आणि ट्रान्सलेटर, पब्लीक रिलेशन विशेषज्ञ, टॅक्स कन्सलटंट, आर्थिक नियोजनाचे विश्लेषक, वेब डिझायनर, गणिततज्ञ, क्लार्क, प्रुफरीडर, स्टेनो, अकाऊंटंट, ऑडीटर, न्यूज अनालायझर, डाटा मॅनेजर, हवामानाचा अंदाज वर्तवणारे तज्ञ, शिक्षक, डॉक्टर सर्जन, पॉलीसी अनालायझर, मार्केटिंग, इन्शुरन्स एजंट इ. क्षेत्रातील मानवी गरज संपुष्टात येणार आहे. ही गरज जरी प्रत्यक्ष संपणारी असली तरी या क्षेत्रातला मानवाचा रोल बदलणार आहे. तो लक्षात घेऊन तसे कौशल्य विकसीत करणे गरजेचे आहे तरच हे तंत्रज्ञान आपल्यावर भारी ठरणार नाही . आज प्रत्येक क्षेत्रात ए.आय. चा प्रवेश हा अटळ आहे परंतू इतर संबंधीत बाबी हाताळण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता ही राहणारच आहे. गरज आहे ती ते तयार करण्याची व स्वतःला त्यानुरूप बदलण्याची.
केवळ गंमत म्हणून आलेल्या या तंत्रज्ञानाने मानवी बुद्धिलाच पर्याय उभा केला आहे. अचूक व वेगवान विना कंटाळा 24×7 काम करणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे मानवी जमातीत खळबळ उडाली आहे. कार्पोरेट क्षेत्रात तर याचे परिणाम लगेच दिसून येत आहेत. या वेगाने आपण स्वतःला बदलले नाही तर मात्र फार मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची भिती निर्माण झाली आहे. यासाठी शिक्षण पद्धतीत व आपल्या विचार करण्याच्या पध्दतीत बदल करण्याची गरज आहे.
आज अनेक कंपन्या या तंत्रज्ञानामूळे आपल्या कर्मचार्यांना कामावरून कमी करत आहेत. कारपोरेट क्षेत्रात यामूळे संभ्रम व अस्थिरता निर्माण झाली आहे. पुढील काळात अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यात कर्मचार्याची आवश्यकता राहणार नाही त्यामूळे बेरोजगारी व अराजकता निर्माण होईल असे चित्र मांडले जात आहे. पण मला वाटते ही भिती अनाठायी आहे. गरज आहे ती फक्त योग्य उपाययोजना करण्याची.
जी भीती गॅलिलीओ बाबत पोपना, डार्विन बाबत इंग्लंडच्या धर्मपीठाला वाटत होती तीच भीती आज काही तथाकथीत लोकांना वाटत आहे.
सुमारे 5500 वर्षापूर्वी पश्चिम आशियात सर्वप्रथम चाक वापरले जायचे असे उत्खननात आढळून आले आहे. तेव्हापासून निरंतर बदल आणि शोध लागतच आहेत. मानव निर्माण झाल्यापासून ते आजपर्यंत अनेक शोध लागले मानव प्रगती करीतच राहिला प्रत्येक टप्यावर त्याच्यावर कोणीतरी भारी पडेल असे वाटत राहिले पण बुद्धीच्या जोरावर निसर्गातील सर्वात कमजोर असलेला मानव टिकून आहे व प्रगती करत आहे.
सध्याचे युग हे विज्ञान युग आहे. वेगवान बदलाचा काळ सध्या सुरु आहे. रस्ता चांगला असेल गाडीचा वेग भरधाव असेल तर कमी वेळात ध्येय गाठता येते पण अपघाताचा धोका ही असतो. गरज असते ती कुशल चालकाची व वाहनाला योग्यपणे नियंत्रित करणाऱ्या चालकाची. अपघाताच्या भितीपोटी प्रगतीचा वेगच नियंत्रित करणे हे योग्य नव्हे व कोणत्याही देशाला ते परवडणारे नाही.
गरज आहे त्या हष्टीने विचार करण्याची व तसा अनुकूल नागरीक घडवण्याची त्यासाठी एकूण शिक्षण पध्दतीत बदल करण्याचीच गरज निर्माण झाली आहे.
कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग मानवी सुख सुविधेसाठी करून त्याला आपल्यावर वरचढ न होऊ देता नियंत्रित पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. यासाठी नवीन पीढी आळशी व व्यसनाधिन न होता अचूक व वेगवान विचार प्रवण कशी बनेल याचा विचार करणे गरजेचे आहे. या वेळी बेसावध राहणे हे मानव जातीच्या भवितव्यासाठी घातक ठरू शकते. मुळात मानवाचे अस्तीत्व पृथ्वीवर टिकून आहे तेच मुळी त्याच्या बुद्धीमत्तेमुळे. त्या बुद्धीलाच पर्याय आपण निर्माण केलाय तर त्या पर्यायालाही पर्याय आपणालाच निर्माण करावा लागेल व तो ही वेळेच्या आत तरच आपले अस्तीत्व टिकून राहणार आहे. ती क्षमता आपल्यात निश्चित आहे. हजारो वर्षापासून आपण ती दाखवून देत आलो आहोत गरज आहे ती आळस झटकून टाकण्याची व पुन्हा जोमाने वेगवान प्रयत्न करण्याची. विजय आपलाच आहे.
शेवटी काहीही झाले तरी मानसीक व भावनीक स्तरावर यंत्र हे मानवाच्या शंभर टक्के गरजा कधीही पूर्णपणे भागवू शकणार नाहीत म्हणून मानवाचे महत्व हे कायमच राहिल यात शंकाच नाही.
प्रा. विजयकुमार प्र. दिग्रसकर