
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशातच आता उन्हाळ्यात होणार्या विषाणूजन्य रोगांमुळे पशुधनावर नवे संकट ओढवले आहे. वाढत्या उष्णतेमुळे मिळेल तेथे पाणी पिऊन जनावरे आपली तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यामुळे त्यांना ताप, अपचन आदी विषाणूजन्य संसर्गाचा धोका बळावत आहे. उन्हाच्या झळांचा तडाखा जनावरांना बसत आहे. दूध उत्पादनाला फटका बसला आहे. प्रखर सूर्यकिरण व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांत उष्माघात होऊ शकतो.
उष्णतेमुळे जनावरे थकतात, त्यांची भूक मंदावते. जनावरांना तिव्हा (डेंग्यू)चे प्रमाणात वाढ होत असून, गर्भपात, अकाली प्रसूतीचे प्रमाणात वाढ होत आहे. पशुपालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन इंदापूर तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे यांनी केले आहे. गोचीड तापाची लक्षणे साधारणपणे जून, जुलै महिन्यात आढळतात. मात्र, आताच ती आढळून येत आहेत.
गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांमध्ये गोचीड, गोमाशा झाल्याने या तापाचा फैलाव होतो. वाढती उष्णता, जनावरांचा गोठा स्वच्छ नसेल तर हा आजार उद्भवतो. तापाने जनावरांची भूक कमी होऊन, दुग्धोत्पादनात घट होत आहे. गोचीड जनावरांच्या रक्ताचे शोषण करत असल्याने जनावरांची रोगप्रतिकारकशक्तीही कमी होत आहे. अशी जनावरे आजाराला लवकर बळी पडत आहेत.
काही दिवसांपासून उष्णता वाढत असल्याने जनावरांना धोका वाढत आहे. उष्णतेमुळे गाई, म्हशी गाभण राहण्याचे प्रमाण घटले आहे. जनावर गाभडण्याचे प्रमाणही वाढत आहे. प्रसूतीनंतर वार लवकर पडत नाही. जनावरांना, दुपारी किंवा भरउन्हात चरण्यासाठी सोडू नये. वाळलेला चारा आणि खुराक शक्यतो सकाळी व संध्याकाळी द्यावा. दुपारच्या वेळी हिरवा चारा द्यावा. कडक उन्हात जनावरांच्या अंगावर थंड पाणी टाकू नये.असे आवाहन डॉ.रामचंद्र शिंदे व डॉ. तेजस हांगे यांनी केले आहे.