
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर साळुंके
अंबड येथील कॅनरा बॅंकेच्या शाखेतून कॅशिअर ने आणि डेलीव्हेजसवर काम करणाऱ्या एका मुलाला मदतीला घेऊन संगनमत करून 23 लाख 13 हजार रुपये परस्पर लांबविल्याचे नव्याने रुजू झालेले बँकेचे मॅनेजर कमलेश साळवे यांच्या लक्षात येताच याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील बॅंकेचे रिजनल हेड बिनयकुमार पंचानंद दाश यांना कळविण्यात आल्याने अंबड पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कॅशीअर सुजीत कुमार रामसागर पाठक (रा. विठ्ठल पेठ इचलकरंजी जि कोल्हापूर ह.मु. स्वामी समर्थ नगर जवळ अंबड) व योगेश प्रभाकर काळबांडे (रा रूई , ता अंबड जि जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
बिनय कुमार पंचानंद दाश (वय 47 वर्षे व्यवसाय- रिजनल हेड, कँनारा बँक, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, सुमारे 2 वर्षांपासून कँनरा बँक येथे क्षेत्रिय प्रमुख म्हणून दाश काम करतात. जालना जिल्ह्यातील अंबड येथील कॅनरा बँकमध्ये मॅनेजर असलेले कमलेश साहेबराव साळवे (रा. जळगाव सपकाळ ता. भोकरदन जि. जालना) यांनी दि 23/05/2023 रोजी अंबड येथील कँनारा बँकेचा मॅनेजर म्हणून चार्ज घेतला. व बँकेतील रोख रक्कम चेक करत असताना त्यांना बँकेमधील सूरक्षा पेटीतील 23 लाख 13 हजार 59 रूपये कमी असल्याबाबत दिसून आले. त्यामुळे कमलेश साळवे यांनी बँकेचे रिजनल हेड बिनय कुमार पंचानंद दाश यांना ईमेल द्वारे सविस्तर कळवले. त्यानुसार रिजनल हेड बिनय कुमार पंचानंद दाश यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मंडळ प्रबंधक श्रीनिवास गट्टू यांना खात्री करण्याकरिता अंबड येथील कॅनरा बँकेमध्ये पाठविले होते. त्यांनी रिजनल हेड बिनय कुमार पंचानंद दाश यांना अंबड येथील कॅनारा बँकेमध्ये 23 लाख 13 हजार 59 रूपयाचा फरक असल्याबाबत सांगितले.
रिजनल हेड बिनय कुमार पंचानंद दाश यांनी अंबड येथील कॅनारा बँकचे सर्व रेकॉर्ड चेक केले असता, बँकेतील कॅशिअर सुजीत कुमार रामसागर पाठक (रा. विठ्ठल पेठ इचलकरंजी जि कोल्हापूर ह.मु. स्वामी समर्थ नगर जवळ अंबड) यांनी दि 30/07/2022 रोजी दूपारी 01.15 वाजेच्या सुमारास ते दि 08/03/2023 दूपारी 03.30 वाजेच्या दरम्यान कॅनारा बँक शाखा अंबड येथील डेली व्हेजेसवर असणारे योगेश प्रभाकर काळबांडे (रा रूई , ता अंबड जि जालना) याच्या खात्यावर बँकेमध्ये जमा होणा-या रकमेपैकी बँकेचा अपहार करून परस्पर रक्कम योगेश यांच्या आमच्याच बँकेच्या खात्यावर टाकून योगेश हे परत ती रक्कम सुजीत पाठक यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यावर टाकत असल्याबाबत निदर्शनास आले.
बँकेचे रिजनल हेड बिनय कुमार पंचानंद दाश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस स्टेशनमध्ये कॅशिअर सुजीत कुमार रामसागर पाठक (रा. विठ्ठल पेठ इचलकरंजी जि कोल्हापूर ह.मु. स्वामी समर्थ नगर जवळ अंबड) व योगेश प्रभाकर काळबांडे (रा रूई , ता अंबड जि जालना) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.