
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे श्रध्दास्थान श्री मारुतीचे भोगाव नगरी येथे बी.आर.एस्. पक्षाचे नेते तथा नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षण व बांधकाम समितीचे माजी सभापती संजय पाटील कराळे व राम पा.पवार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
विकास पाटील क्षीरसागर यांच्यातर्फे श्री महारुद्र देवस्थानाच्या विनम्र भक्ती प्रित्यर्थ रोट (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संजय पाटील कराळे व राम पा.पवार आवर्जून उपस्थित राहिले होते. या प्रसंगी हजारो भाविक-भक्तांनी व श्री.क्षीरसागर यांचे समस्त नातेवाईक, आप्तेष्ट व मित्र मंडळींनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
भोगाव नगरीतील श्री महारुद्र देवस्थानाची व या श्रध्दास्थळाची महती केवळ परभणी जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात सर्वदूर अशी पसरलेली आहे. आपली इच्छा आकांक्षा पूर्ती करणारे तथा नवसाला पावणारे श्रध्दास्थान म्हणून या देवस्थानाची महती मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. ज्या भक्तांना या पवित्र स्थळी रोट (महाप्रसाद) चे आयोजन करण्याची श्रद्धापूर्वक मनोमन इच्छा असते, त्यांना त्यासाठी नांव नोंदनी करणे आवश्यक असते. परंतु त्यासाठी महिनोन्महिने प्रतिक्षा करावी लागते. तद्वतच या देवस्थानाप्रति अपार श्रध्दा असणाऱ्या भाविकांची संख्या किती मोठ्या प्रमाणात असू शकेल, ते यावरुन स्पष्ट झाल्यास नवल वाटू नये. या औचित्यावर ज्यांच्या वतीने हा समारंभ आयोजित केला जातो, त्यांचे जेवढे निकटवर्तीय, घनिष्ठ पाहुणे मंडळी असतात, ते बहुतांश पाहुणे परंपरेनुसार कपड्यांचा आहेर आणत असतात. श्री मारुती रायांचा असा हा अगाध महिमा आणि भाविक-भक्तांच्या पराकोटीची अपार श्रध्दा किंबहुना त्यासाठीच या देवस्थानाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळत असते. त्यातूनच मंदीराचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला आहे. अजूनही विकासाचे कार्य जोमाने प्रगतीपथावर आहे.