
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांच्या सह पाच संचालकाविरुद्ध तिघा अर्जदारांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या ( समिती निवडणूक अधिनियम) अन्वये बाजार समितीचे संचालक म्हणून अपात्र करून संचालक पदावरून काढून टाकावे. असा तक्रार अर्ज दाखल केली होता. या प्रकरणात बुधवारी ( ता.२६ ) छत्रपती संभाजीनगरच्या सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी दिलेल्या निर्णयात तक्रारदाराचे म्हणणे रास्त ठरवत पाच संचालकांना अपात्र ठरविले आहे.
अर्जदार झुंजार गणपतराव पाटील ( रा. वाढवणा ), हणमंत सोपानराव शेळके (डोंगरशेळकी ), भिवाजी मोतीराम चिखले ( रा. शेल्हाळ ) यांनी ता. ८ जून २०२३ रोजी विधीज्ञामार्फत महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या ( समिती निवडणूक ) नियम, २०१७ चे नियम अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यात बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हणमंतराव हुडे , संचालक पद्माकर मनोहर उगिले, शामराव समर्थ डावळे, बालाजी मषणाजी देवकते, ज्ञानेश्वर विश्वंभर पाटील यांना बाजार समितीचे संचालक म्हणून अपात्र करून त्यांना संचालक पदावरून काढून टाकावे. अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.
गैरअर्जदार शामराव समर्थ डावळे यांनी राज्याचे पणन मंत्री यांच्याकडे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्ज दाखल करून अर्जदार यांनी दाखल केलेला अर्ज लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे समोर न चालवता, तो अर्ज महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे स्थलांतर करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती केली होती. गैरअर्जदार यांच्या अपीलानुसार पणन मंत्रालयातील कक्ष अधिकारी यांच्या आदेशानुसार सदर प्रकरणातील संबंधित सर्व संचिका व कागदपत्रे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणाची छत्रपती संभाजी नगर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अर्जदार व गैरअर्जदार यांना सुनावणी नोटीस निर्गमित करून पाच वेळा सुनावणी घेतली.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी मतदार संघातून समिती सदस्यपदी निवडून आलेले शिवाजीराव हनुमंतराव हुडे हे सचिन अग्रो फुड एलएलपी या नावाचे फर्ममध्ये भागीदार आहेत. पद्माकर मनोहर उगिले हे अंगधीराज फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक असून प्रक्रिया व विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. शामराव समर्थ डावळे व बालाजी मष्णाजी देवकत्ते हे दोघे शासन अनुदानित शैक्षणिक संस्थेत नोकरीस आहेत. तर ज्ञानेश्वर विश्वंभर पाटील हे पृथ्वी ॲग्रो अँड ऍग्रो रिसर्च असोसिएशनचे संचालक आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था समिती ( समितीची निवडणूक ) नियम १० मधील तरतुदीनुसार बाजार समितीचे प्रतिवादी सभापती व अन्य चार संचालक यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत शेतीपासून नसल्याने त्यांनी बाजार समिती सदस्यपदी राहण्यासाठी अपात्रता धारण करीत असल्याने वादीचा अर्ज मंजूर करण्यात येऊन प्रतिवादी शिवाजीराव हनुमंतराव हुडे, पद्माकर मनोहर उगिले, शामराव समर्थ डावळे, बालाजी मषणाजी देवकते, ज्ञानेश्वर विश्वंभर पाटील यांना कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर संचालक पदावर कार्यरत राहण्यास अपात्र ठरवीत असल्याचा निर्णय छत्रपती संभाजी नगर सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी दिला आहे.
( विरोधकांनी केला जल्लोष )
छत्रपती शिवाजी चौकात विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करत, पेढे वाटुन, फटाके फोडुन जल्लोष साजरा केला . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रामराव बिरादार, हनुमंत शेळके,मनोज चिखले , सुभाष धनुरे, सुरेंद्र अक्कनगीरे, शहाजी पाटील तळेगावकर, भालचंद्र(बबलू) घोणसिकर यांच्यासह भाजप महायुतीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
( राजकीय द्वेष बुद्धीतून रचलेले षडयंत्र )
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापूर्वीही पाच वर्ष सभापती म्हणून मी कार्य केलेले आहे. सध्या काँग्रेस पक्षातून सक्रिय झाल्यामुळे भाजप महायुती घटक पक्षातील पुढारी नेते माझ्यावर नाराज आहेत. विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या उमेदवारासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाल्यामुळे आमच्या विरोधात रचलेले हे षडयंत्र आहे. आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्याय मागणार आहोत.
शिवाजीराव हुडे
सभापती,
कृषी उत्पन्न बाजार समिती, उदगीर