
विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम आता चांगलाच रंगत आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाले आहे. ठाकरे गटाने आज एकापाठोपाठ 2 याद्या जाहीर केल्या आहेत. वर्सोवा मतदारसंघामध्ये मात्र बंडाचे निशाण फडकले आहे.
‘३५ वर्षाची अहोरात्र मेहनत,त्याग, पक्षनिष्ठा, संघटने प्रति समर्पण, केसेस, समाजकार्य या बदल्यात सततचा होणारा अन्याय’ असं म्हणत राजू श्रीपाद पेडणेकर यांनी अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हरून खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात बंडाळी उभी राहिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार समजले जाणारे राजू पेडणेकर यांनी अन्याया विरुद्ध न्यायाचा लढा सुरू केला आहे. राजू पेडणेकर यांची पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मशाल चिन्ह हटवलं आहे. त्यामुळे आता राजू पेडणेकर अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
‘३५ वर्षाची अहोरात्र मेहनत,त्याग, पक्षनिष्ठा, संघटने प्रति समर्पण, केसेस, समाजकार्य या बदल्यात सततचा होणारा अन्याय! २००४,२००९,२०१४,२०१९ आता २०२४ ला या सर्वाचा न्याय निवाडा माझ्या वर्सोवा विधानसभेतील माझ्या जिवाभावाचे शिवसैनिक, कार्यकर्ते आणि सर्व सामान्य जनता नक्कीच करेल ही त्यांच्याकडून अपेक्षा. मी या अन्याय विरुद्ध लढत आहे. तीन दशकाच्या माझ्या राजकीय सामाजिक जीवनाच्या प्रवासात कधीतरी हा छोटासा कार्यकर्ता तुमचा राजू तुम्हाला उपयोगी पडला असेल तर मला नक्की बळ द्या! अन्यायाविरुद्धच्या या लढाईत सामील व्हा,आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा, असं म्हणत राजू पेडणेकर यांनी आपल्याच पक्षाविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.