
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीने मंगळवारपासून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. कोल्हापूरमधील जाहीर सभेत महायुती सरकारने ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ अशी टॅगलाईन घेत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गट आपला वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. याचे कारणही समोर आले आहे.
कोल्हापूरच्या सभेत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थित जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढवण्यासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबर वृद्धांना पेन्शन आणि शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय देखील घेतला जाईल, असे महायुतीने जाहीरनाम्याच्या माध्यमातून सांगितले आहे.
महायुतीने एका बाजूला आपली सत्ता आल्यानंतर काय करणार याचे आश्वासन जनतेला दिले. त्यानंतरही आता अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीने आपला वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची भूमिका घेतली आहे.
वेगळा जाहीरनामा का?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज बारामतीमध्ये आपला वेगळा जाहीरनामा जाहीर करणार आहे. याचं कारण समोर आले आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समुदायासाठी घोषणा करण्यात आल्या नाहीत. अजित पवारांकडून मात्र आपल्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समुदायासाठी आश्वासने देणाऱ्या घोषणा असणाऱ्या असणार आहेत.
महायुतीमध्ये अजित पवार गटाने अल्पसंख्यांक उमेदवारांना संधी दिली आहे. भाजप आणि शिंदेसोबत युती केल्यानंतर आपली धर्मनिरपेक्ष भूमिका कायम असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पाठिशी असणारा अल्पसंख्याक आणि इतर मतदार दुरावला गेला. त्यानंतर अजित पवारांनी आपली पुरोगामी, धर्मनिरपेक्षता भूमिका कायम असल्याचे सातत्याने म्हटले. आता, स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करत अजित पवार अल्पसंख्याक मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.
महायुतीचा दहासूत्री जाहीरनामा, कोणकोणत्या घोषणा?
-लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन
-शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15 हजार रुपये देणार
-प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देणार
-वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये रुपये देणार
-जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार
– 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये देणार
– 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार (ग्रामीण भागांत रस्ते बांधण्याचे वचन)
-अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15 हजार रुपये वेतन आणि सुरक्षा कवच पुरवणार
-वीज बिलात 30 % कपात करणार, सौर आणि अक्षय उर्जेवर भर देण्याचे वचन
-सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र @2029