
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यात विविध विकास कामांना गती दिली विशेषतः पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाकडे त्यांचे अधिक लक्ष होते. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रखडलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पूर्तता करण्याचा त्यांनी ध्यास घेतला.
त्यामुळेच अटल सेतू, मुंबई मेट्रो असे प्रकल्प पूर्ण झाले किंवा त्यांचे काही टप्पे तरी कार्यान्वित झाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात गती देण्यात आले. शहरी भागाच्या विकासाकडे लक्ष देत असतानाच ग्रामीण भागात देखील विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकडे एकनाथ शिंदे यांचे लक्ष होते.
धाराशिव हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा. या जिल्ह्यात ज्ञानराज चौगुले आणि तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांचे दोन खंदे शिलेदार आहेत. या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघांना म्हणजेच परांडा आणि उमरगा लोहारा तालुक्यांना अधिकचा निधी मिळाला. पण संपूर्ण जिल्ह्यातच विकास कामांची गती अखंडित राहावी यासाठी शिंदे यांनी आणि त्यांच्या सरकारने देखील हात आखडता घेतलेला नाही.
सिंचन क्षेत्रावर भर
बेनीतुरा उगम ते संगम अशा परिसरात जलसंधारण योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत 34 एफआरपी बंधारे बांधण्यात आले. या योजनेसाठी भरीव निधी राज्य सरकारने मंजूर केला. सुमारे 68 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यात या योजनेमुळे यश मिळाले तसेच दोन लाख 17 हजार 194 क्युबिक मीटर पाणी कर्नाटकात जाण्यापासून रोखण्यास या योजनेमुळे यश मिळाले आहे.
उमरगा, लोहारा आणि मुरूम या शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधणीसाठी 425 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. उमरगा शहरात सार्वजनिक स्मशानभूमीसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला. मराठा आणि धनगर अशा दोन्ही समाजासाठी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे तसेच उमरगा शहरात विविध ठिकाणी सौंदर्यकरण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी देखील राज्य सरकारने दिला आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना धाराशिव जिल्ह्यात कार्यान्वित केली. या योजनेचा 250 हून अधिक खेड्यांना लाभ झाला. या माध्यमातून सातशे किलोमीटर काम पूर्ण झाले असून पाण्याची साठवण क्षमता चार टीएमसीने वाढली आहे तसेच भूजल पातळी देखील बारा टीएमसी पेक्षा अधिक वाढली आहे. कृष्णा मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेसाठी 11 हजार 723 कोटी रुपयांचा निधी खेचून आपल्या परिसराला 7 टीएमसी पाण्याची उपलब्धता होईल याची दक्षता घेण्यात आली आहे.
आरोग्य सुविधा आणि महिला सबलीकरणाकडे विशेष ध्यान
लोहारा तालुक्यातील माकणी आणि काणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अत्याधुनिक इमारतींसाठी प्रत्येकी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सस्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे आणि त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील आरोग्य केंद्रालाही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
आमदार तथा मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून क्रांती महिला उद्योग समूहाची स्थापना धाराशिव जिल्ह्यात करण्यात आली. गृहोपयोगी वस्तू, अन्नपदार्थ आणि सजावटीच्या वस्तूंचा व्यवसाय या माध्यमातून केला जातो. या उद्योग समूहाच्या माध्यमातून वीस हजार हून अधिक महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली असून लाखो रुपयांची उलाढाल या उद्योग समूहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, तसेच तानाजी सावंत यांनी स्वखर्चाने भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात 120 डिजिटल बोर्ड देऊ केले आहेत. या डिजिटल बोर्डाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण 400 हून अधिक शिक्षकांना देण्यात आले आहे.
प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल मंजूर झालेला धाराशिव महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. वर्षभरात 28 ते 30 कोटी रुपये जिल्ह्यातील क्रीडा संकुलाच्या विकासावर खर्च करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शाळांचे क्रीडांगण विकास आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल दोन कोटी 70 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे.
शेतकऱ्यांनाही बळ
शेती हा धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहे. 2024 मध्ये राज्य सरकारच्या हस्तक्षेपातून इंडियन एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने 2022 च्या खरीप हंगामात झालेल्या शेती नुकसानी पोटी जिल्ह्यात 232 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले आहे. धाराशिव जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो त्यामुळे येथे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष आहे. वर्ष 2024 मध्ये राज्य सरकारने निम्न खैरी प्रकल्प, दिंडेगाव जलसिंचन प्रकल्प आणि जाम जलाशय यांच्यासाठी भूसंपादनास मान्यता दिली आहे.
आशियाई विकास बँक यांनी बाराशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात पाचशे खाटा क्षमतेचे जिल्हा रुग्णालय बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि दर्जेदार होणार आहे. 2023 मध्ये कवडगाव टेक्सटाईल इंडस्ट्रियल प्रोजेक्ट प्रस्तावित करण्यात आला या माध्यमातून दहा हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांना गती देण्यात येत असून शेती आणि सिंचन क्षेत्रावर भर देण्यात आला आहे.