
कुरळप : येथील इंदुमती राजाराम पाटील (वय ७०) या वृद्धेचा हात-पाय, तोंड कपड्याने बांधून व विळ्याने वार करून खून (Murder Case) करण्यात आला.
खुनानंतर उसाच्या फडात निर्जन ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळल्याने मारेकरी नजीकचा असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मारुती राजाराम पाटील यांनी कुरळप पोलिसांत (Kurlap Police Station) याबाबत तक्रार दाखल केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, सायंकाळपर्यंत कोणाला ताब्यात घेतलेले नव्हते.
याबाबत अधिक माहिती अशी, इंदुमती पाटील या कुरळप (ता. वाळवा) येथील त्यांच्या घरी एकट्याच राहत होत्या. यापूर्वी इतरांच्या शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. आता वय वाढल्याने एक, दोन शेळ्या पाळून त्यावर त्या आपली उपजीविका चालवत होत्या. गुरुवारी (ता. ७) दुपारी घरातून शेळ्यांना चारा आणण्यासाठी ऐतवडे खुर्द-कुरळप (चांदोली वसाहत) पवार वस्तीलगतच्या इतरांच्या शेतात गेल्या होत्या.
अनेक वर्षांपासून या परिसरात त्यांचा राबता होता. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने गावातील त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. दरम्यान, त्यांच्या अंगावरचे छोटेसे कापड उसाच्या फडात सापडल्यानंतर नातेवाइकांनी सकाळी पवार वस्तीनजीक पुन्हा त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी मुख्य रस्त्यापासून आत दोनशे मीटरवर उसाच्या फडात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे दोन्ही हात व तोंड कापडाने आवळून बांधले होते. पोटात विळ्याचा खोलवर वार केलेला होता. नातेवाइकांनी कुरळप पोलिसांना तातडीने याबाबत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला.
श्वानाला पाचारण करण्यात आले. दुपारपर्यंत मृतदेह जागेवरच होता. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय सांगली-मिरज येथे पाठविण्यात आला. याप्रकरणी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध कुरळप पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुमती पाटील यांच्या पश्चात कोणीच नसल्याने मारेकरी शोधण्याचे कुरळप पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण आहे. शेळ्यांना चारा काढण्यासाठी रस्त्यालगत त्यांचा वावर कायम असल्याचे बघ्यांनी सांगितले. खुनानंतर उसाच्या फडात निर्जन ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळल्याने मारेकरी नजीकचा असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील करत आहेत.