
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका राज्यात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिममधून विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. नागपूरमध्ये जाहीर सभेत बोलताना त्यांनी मी एकटाच असा माजी मुख्यमंत्री आहे ज्याचं घर मुंबईत नाही असं म्हटलं.
मला नागपूरकर असल्याचा अभिमान असून देशात आणि राज्यात सरकार आल्यावर नागपूरचा चेहरामोहरा बदलण्याचं काम झाल्याचंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोक आज मला देवाभाऊ म्हणून प्रेमानं हाक मारतात. आजपर्यंतच्या कारकिर्दीत मी कधी स्वत:चा विचार केला नाही. स्वत:चा उद्योग उभारला नाही. सतत समाजासाठी काम करत राहिलो. राज्यात आजपर्यंत २० मुख्यमंत्री झाले. पण त्यामध्ये मी एकटाच असा माजी मुख्यमंत्री आहे ज्याचं मुंबईत घर नाही. मला नागपूरकर असल्याचा अभिमान आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर आरोप करताना म्हटलं की, काँग्रेस सरकारनं लाड पागे समितीचा अहवाल गुंडाळून ठेवला होता. पण आपल्या सरकारने लागू करून वाल्मिकी, सुदर्शन आणि मखियार समाजांना न्याय दिला. ओबीसींच वेगळं मंत्रालय उभारलं. वेगवेगळ्या योजना आणल्या. ५२ हॉस्टेल उभारण्यात आली. महायुतीने सर्वच समाजांचा विचार केला.
पहिल्या टप्प्यात प्रचारासाठी किती खर्च..?
आतापर्यंत निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी 64 हजार 136 रुपये खर्च केले आहेत. तर निवडणूक खर्चात दक्षिण नागपूरचे काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव सर्वात आघाडीवर आहेत. पांडव यांनी 6 लाख 56 हजार 675 रुपये खर्च केले. पहिल्या टप्प्यातील खर्चाची माहिती उमेदवारांकडून निवडणूक प्रशासनाला देण्यात आली आहे.