
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. १२) दुपारी दोन वाजता सोलापूर शहरातील होम मैदानावर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळ ते सभेचे ठिकाण, हा मार्ग दुपारी १२.३० किंवा एकपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल.
याशिवाय रंगभवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डफरीन चौक, पंचकट्टा या मार्गावरील वाहतूक देखील सभा संपेपर्यंत बंद असणार आहे.
जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर- मंगळवेढा, शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांची सोलापूर शहरात सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींसमवेत बैठक घेवून आढावा घेतला आहे. सभेसाठी जवळपास एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. अख्खे वाहतूक पोलिस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या मार्गावर असतील.
याशिवाय त्यांची सुरक्षितता व लोकप्रियता लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी २४ तास सोलापूर विमानतळ, दौऱ्याचा मार्ग, होम मैदान या मार्गावरून मानवी जिवितास, आरोग्याला व सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास किंवा सार्वजनिक प्रशांतता बिघडण्यास कारणीभूत होतील, अशा सर्व वस्तू, पदार्थ नेण्यास तसे विनापरवाना बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. या बाबींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे.
१० वर्षांत पंतप्रधान सहाव्यांदा सोलापुरात
२०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी पहिल्यांदा नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आले आणि होम मैदानावरच त्यांची जाहीर सभा पार पडली होती. त्यानंतर विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पार्क स्टेडिअमवर त्यांची सभा पार पडली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी सोलापूर व अकलूज येथे त्यांच्या सभा पार पडल्या. १९ जानेवारी २०२४ रोजी रे-नगर घरकूल प्रकल्पाच्या लोकापर्णासाठी आले होते. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सहाव्यांदा ते सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. एकाच वर्षात दोनदा ते सोलापूर दौऱ्यावर येत आहेत हे विशेष. सहावेळा सोलापूर दौऱ्यावर येणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत.