
अजित पवार यांचा धडाडीपणा आपण जाणून आहोत. त्यांच्या स्वभावाचं अनुभव परत एकदा राज्यातील लोकांना आला. श्रीरामपूर येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी आपल्या सुरक्षेची पर्वा न करता सभेसाठी आलेल्या नागरिकांना आपल्या स्टेजजवळ बोलवलं.
माझं काही बरंवाईट झालं तर त्याला मी जबाबदार असेल, असं म्हणत अजित पवारांनी उन्हात बसलेल्या लोकांना आपल्या स्टेजजवळ बसण्यास सांगितलं.
काही बरंवाईट होईल त्याला मीच जबाबदार -अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लहू कानडे यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आलीय. कानडे यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार यांनी श्रीरामपूरमध्ये सभा घेतली. मात्र सभेसाठी टाकण्यात आलेला मंडप हा लहान होता. त्यामुळे अनेकांना उन्हात उभे राहत सभा ऐकावी लागत होती. त्यावेळी बोलतांना अजित पवार यांनी आपल्या सुरक्षेची काळजी न करता त्यांनी नागरिकांना स्टेजजवळ बोलवलं.
कानडे यांच्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्याला पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. लहानपणी मी सुट्टीत देवळाली प्रवरा येथे आजोळला यायचो. त्यावेळी चित्रपट बघायला श्रीरामपूरमध्ये यायचो. तेंव्हा श्रीरामपूरमध्ये सुबत्ता होती. त्या काळचे वैभव आज का? दिसत नाही,असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला. भाजपसोबत सरकारमध्ये सत्तेत राहण्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, मी शिव, फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा कार्यकर्ता आहे. मागच्या सरकारमध्ये शिवसेना होतीच ना? जनतेच्या हितासाठी सर्व समाज घटकांना सोबत घ्यावे लागते.
कानडे हेच आहेत महायुतीचे उमेदवार
नेवासा मतदारसंघात माझ्या उमेदवाराला मी अर्ज मागे घ्यायला लावला. मात्र इथे शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे माघारीच्या दिवशी नॉटरिचेबल झाले. दरम्यान सोमवारी शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतलेले भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री सभेसाठी येणार होते. मात्र आपण त्यांना सभा न घेण्यास सांगितलं, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा रद्द केल्याचं अजित पवार म्हणाले.
कांबळेंचा वाढला रक्तदाब
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत येत आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन दिवसांपूर्वी लहू कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सभा घेतली होती. या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांची उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी आज सभा पार पडणार होती. मात्र एकनाथ शिंदे यांची सभा अचानक रद्द करण्यात आली. हे अजित पवारांनी मुख्यमंत्री यांना सभा न घेण्यास सांगितले होते, याचा खुलासा खुद्द अजित पवारांनी केला.