
कर्नाटक मध्ये वक्फ बोर्डाने अनेक गावांवर तसेच चारशे वर्ष जुन्या मंदिरांच्या जागांवर देखील आपली संपत्ती असल्याचा दावा केला. त्यामुळे मोदी सरकारने वक्फ बोर्डाचा कायदा बदलण्याचा कायदा करण्यासाठी प्रयत्न केला.
पण काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाने त्याला विरोध दर्शवला आहे. मात्र मोदी सरकार वक्फचा कायदा बदलल्याशिवाय राहणार नाही .आता कुणाच्याही भूमीवर या कायद्याने कब्जा करता येणार नाही, असा इशारा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव घेऊन धुळ्यातून दिला आहे
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात दोंडाईचा येथे आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार रावल, शिरपूरचे काशीराम पावरा ,धुळे शहरचे अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे राम भदाणे तसेच साक्रीच्या मंजुळाताई गावीत यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला आमदार अमरीशभाई पटेल ,भाजपा ओबीसी आघाडीचे विजय चौधरी ,माजी खासदार सुभाष भामरे ,माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरतीताई देवरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष देवरे, यांच्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती होती. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर घणाघात केला. काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी हे अनुसूचित जाती व जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गाच्या विरोधात आहेत. मोदी सरकारने प्रथमच आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 27 टक्के मंत्री ओबीसी आणि मागासवर्गीय आहेत. तर अनुसूचित जाती प्रवर्गाचे सर्वात जास्त खासदार भाजपाचे आहेत. काँग्रेस आघाडी मात्र या सर्व प्रवर्गांच्या विरोधात धोरण राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना देशभरातील उलेमांनी भेट दिली. त्यांना मुस्लिम आरक्षण देण्यासंदर्भात मागणी केली. काँग्रेसला मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे आहे. पण हे आरक्षण एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला कापून द्यावे लागणार आहे. मात्र राहुल गांधी यांची चौथी पिढी आली. तरीही आम्ही मुस्लिम आरक्षण देणार नाही, असा इशाराच मंत्री शहा यांनी दिला .
काँग्रेसने नेहमी तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचे काम केले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आम्ही 370 कलम हटवले. मात्र आता काश्मीरच्या विधानसभेने 370 कलम वापस आणण्याचा प्रस्ताव केला आहे. पण इंदिरा गांधी या स्वर्गातून आल्या तरीही 370 कलम पुन्हा येणार नाही. व काश्मीर हे भारताचे अंग कोणीही हिसकावून घेणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला .
देशात मनमोहन सिंह यांचे दहा वर्षे सरकार होते. मात्र या कालावधीत काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट होत राहिले. मोदी सरकार आल्यानंतर पाकिस्तानच्या घरात घुसून आम्ही उत्तर दिले. मोदी यांनी देशाला सुरक्षित करण्याचे काम केले. मनमोहनसिंह सरकारने भारताचे अर्थतंत्र अकराव्या नंबर वर सोडले होते. पण मोदी यांनी दहा वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या नंबर वर आणली. 2027 मध्ये ही अर्थव्यवस्था तीन नंबर वर येईल, असा दावा देखील त्यांनी केला .आघाडी सरकारचे नेते खोटे आश्वासन देतात. मात्र मोदी सरकारने दिलेले सर्व आश्वासने म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. 500 वर्ष काँग्रेसने राम मंदिराचे काम अडकवून ठेवले. मात्र मोदी सरकारने केस जिंकून राम मंदिर निर्माण करून त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा देखील केली. या कार्यक्रमाला राहुल गांधी ,शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली नाही. त्यांना त्यांच्या वोट बँकची भीती आहे. मात्र आम्ही अशा कोणत्याही वोट बँकला घाबरत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला 2100 रुपये देणार. शेतकरी कर्जमाफी करणार तसेच किसान सन्मान निधी अंतर्गत प्रत्येकाला 15000 रुपये देणार ,वृद्ध, विधवा, दिव्यांग पेन्शन 2100 पर्यंत करू ,तसेच दहा लाख युवांना प्रत्येकी दहा हजार ट्युशन फी दिली जाईल .राज्यात 25 लाख रोजगार उत्पन्न केले जातील. 25000 गावांमध्ये पांगण रस्ते केले जातील. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक 15000 मानधन मिळेल. व पाच लाखाचा विमा त्यांचा घेतला जाईल असे आश्वासन देखील यावेळी शाह यांनी दिले.