
पुणे:२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेसाठी झालेल्या भाजप राष्ट्रवादी बैठकीत गौतम अदानी उपस्थित होते, असा मोठा गौप्यस्फोट करून राज्याच्या राजकारणात खळबळ माजवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या २४ तासांत घुमजाव केले.
राष्ट्रवादी-भाजप यांच्यात झालेल्या बैठकीला अदानी उपस्थित नव्हते, असे वक्तव्य त्यांनी बुधवारी केले. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही अशी कोणतीही चर्चा झालेली नव्हती, असे स्पष्ट केले आहे. बारामती दौऱ्यावर असलेल्या पवार यांना पत्रकारांनी पाच वर्षांपूर्वी गौतम अदानी आणि अमित शहा यांनी मध्यस्थी केली होती का, असा प्रश्न विचारला असता, अशी कोणतीही मध्यस्थी झाली नाही. गौतम अदानी बैठकीला उपस्थित नव्हते, असे विधान त्यांनी केले.
चर्चा झालीच नाही : शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही असे काही घडले नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आमची चर्चा झाली असती तर आमचे सरकार आलेले तुम्हाला पाहायला मिळाले असते. तथापि, यातील एकही गोष्ट सत्यात उतरलेली दिसली नाही. त्यामुळे अशा प्रश्नांना अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की, निवडणुका आणि तो कालावधी सोडल्यानंतर केंद्रातले मंत्री आणि उद्योगपती भेटत नाहीत, असे मी म्हणालेलो नाही. अनेकवेळा अजित पवारांना सोबत घेऊन मी अदानींची भेट घेतली आहे. त्यांना (अजित पवार) माहिती मिळावी हा त्यामागचा हेतू होता, असे शरद पवार एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.