
चित्रपट, जाहिरात, वेबसीरिज नाही, तर अभिनेता शाहिद कपूर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शाहिदने गेल्या वर्षी एक आलिशान अपार्टमेंट विकत घेतला होता. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की तो लवकरच त्याचे हे अपार्टमेंट भाड्याने देणार आहे.
याबाबत त्याने 60 महिन्यांचा करार केला आहे.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी त्यांचे वरळी येथील लग्जरी अपार्टमेंट तब्बल पाच वर्षांसाठी भाड्यावर देण्याचे ठरवले आहे. हे अपार्टमेंट ओबेरॉय रियालिटी, 360 वेस्ट कॉम्प्लेक्समध्ये असून ते 5395 स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आले आहे. या आलिशान फ्लॅटसोबत 3 पार्किंग एरियांचाही समावेश आहे. गौरी खानच्या कंपनी ‘डी डेकोर होम फॅब्रिक्स’चे वरिष्ठ अधिकारी दीपन भूपतानी यांनी हे अपार्टमेंट घेतले आहे.
७ नोव्हेंबरला या अपार्टमेंटचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असून यासाठी तब्बल 1 कोटी 23 लाखांचे सिक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आले आहे. या करारानुसार, 60 महिन्यांसाठी भाड्याने दिलेल्या या अपार्टमेंटचे सुरुवातीचे भाडे प्रति महिना 20.5 लाख रुपये आहे, जे येत्या काही वर्षांत 23.98 रुपये केले जाईल.
मे 2024 मध्ये शाहिद कपूरने चांदक रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 60 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट खरेदी केले होते. याआधीही शाहिद कपूरने मुंबईत अनेक आलिशान मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्याने 2019 साली वरळी परिसरात असलेल्या एका उंच इमारतीत डुप्लेक्स विकत घेतला. हा फ्लॅट सी-फेसिंग असलेल्या डुप्लेक्स इमारतीच्या 45 व्या आणि 46 व्या मजल्यावर आहे, जो त्याने 56 कोटी रुपयांना खरेदी केला होता. काही महिन्यांपूर्वी शाहिद कुटुंबासह या घरात शिफ्ट झाला होता. या डुप्लेक्समध्ये 500 चौरस फुटांची समुद्राभिमुख बाल्कनी आहे.
शाहिद फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेल्या सायन्स फिक्शन कॉमेडी रोमँटिक चित्रपट ”तेरी बातों में ऐसा उल्झा जिया”मध्ये दिसला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन होती. शाहिद कपूर लवकरच ”देवा” या चित्रपटात दिसणार आहे. ‘देवा’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहिद कपूरसोबत पूजा हेगडे, पावेल गुलाटी आणि कुब्बरा सैत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.