
महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा गवगवा करत असली, किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीची भलामण करत असली, तरी महाराष्ट्राचा सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री कोण??, याविषयी एक अत्यंत वरिष्ठ नेत्याचे वेगळेच मत समोर आले.
हे वरिष्ठ नेते दुसरे तिसरे कुणी नसून थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्राचे सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ना शरद पवारांचे नाव घेतले, ना उद्धव ठाकरेंची भलामण केली, खर्गेंनी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांचे नाव घेतले. जे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवारांनी त्यांना लातूरात अपक्ष उमेदवार उभा करून पाडले होते, त्यांना विधान परिषदेवर पण निवडून यायला अडथळे निर्माण केले होते, त्या विलासराव देशमुख यांचे नाव मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्राचे सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री म्हणून घेतले.
विलासराव देशमुख सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री होतील, असे भाकित एका वरिष्ठ नेत्यांनी 1980 मध्ये केले होते. तसेच झाले. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री ठरले. मी कर्नाटकात महसूल मंत्री होतो. तेव्हा विलासराव महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्राला यशस्वीपणे पुढे नेले. 1980 मध्ये रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांनी विलासराव यशस्वी मुख्यमंत्री होतील, असे मला सांगितले होते. तसेच घडले, अशी आठवण मल्लिकार्जुन खर्गे यांनी लातूरात येऊन सांगितली. अमित देशमुख विलासरावांसारखे आहेत, तर धीरजवर त्याच्या आईची छाप दिसते, असेही खर्गे म्हणाले.
– काँग्रेसच्या लेखी नगण्य स्थान
ठाकरे आणि पवारांचे पक्ष त्या दोघांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचे गोडवे गातात, पण महाराष्ट्राचे सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांचे नाव न घेता मल्लिकार्जुन खर्गे यांनी विलासरावांचे नाव घेऊन त्या दोन्ही नेत्यांना काँग्रेसच्या लेखी त्यांच्या नगण्य राजकीय अस्तित्वाची जाणीव करून दिली.