
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने बदनाम केले, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना गंभीर आरोप केला होता.
अजित पवारांनी ३० वर्ष राजकारण केलं, मात्र सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवारांनी बदनाम केले, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांनी अजित पवार यांना चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनवले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी फक्त बदनामी केली. अजित पवार यांची सर्वात मोठी बदनामी जर कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पार्टीने केली. भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले, अजित पवारांची चौकशी व्हावी ही मागणी भाजपने केली. माझ्या तीन बहिणींवर छापे पडले. त्यांचा काहीही संबंध नसताना ही कारवाई करण्यात आली. अजित पवारांच्या साखर कारखान्यावर ईडीची नोटीस अदृश्य शक्तीने पाठवली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही अजित पवारांवर कोणतेही आरोप केलेली नाहीत. माझ्या बहिणींवर आरोप केला नाही, अजित पवारांना ईडीची नोटीस पाठवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांचा गुणगौवरच केला आहे. अजित पवारांनी एकदा राजीनामा दिला होता, तरीही शरद पवारांनी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री केले. त्यामुळे बदनामी आम्ही केली का भाजपने केली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळेंचं शेलार यांना प्रत्युत्तर –
भाजप नेते आशिष शेलार यांनी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड चे सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडिओ ट्विट करत त्यांच्याकडून कशा पध्दतीने वोट जिहाद सुरू आहे, याबाबत टिका केली. सोबतच मविआवर देखील निशाणा साधला. यावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही.मागच्या निवडणूकीतही भाजपने अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनाच स्वतः सोबत घेतलं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर पलटवार केला.
पाशा पटेल यांच्यावरही तोफ डागली –
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचार सभेत राम शिंदे यांच्यासह भाजप नेते पाशा पटेल यांनी रोहित पवारांना शिवीगाळ करत अश्लील इशारे केल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेयर केला होता. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. हे अतिशय दुर्दैवी असून गलिच्छ असल्याचा सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुसंस्कृत महाराष्ट्रात काय भाषणात केले जात आहे. भाजप हा ओरिजनल संस्कृत पक्ष होता आता हा दुसरा भाजप झाला आहे. जे शब्द वापरले गेले, त्याचा मी निषेध करत असल्याचा सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.