
तुम्ही स्वत: असं म्हटलंय की, जागावाटपाबाबत दोन महिन्यांपर्यंत चर्चा करणं योग्य नव्हतं. यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबत बंद खोलीत काय चर्चा झालीय?
उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी असेल, असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं नाहीय. नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात? की उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री बनवणार?’ या प्रश्नांचं उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीची बैठक घेतली होती. तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे सुद्धा होते. जेव्हा उद्धवजींनी प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा मी म्हणालो होतो की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनतेसमोर जाऊ. आम्ही बंद खोलीत काहीच चर्चा केली नाही. आम्ही स्पष्ट सांगितलं की, आम्हाला महाराष्ट्र वाचवायचा आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मी त्याचवेळी हे ठरवलं. हे लोक महाराष्ट्राला गुजरातमध्ये गहाण ठेवण्याचं काम करत आहेत. खूर्ची आमचं पहिलं ध्येय नाहीय. आमचा मुख्य हेतू महाराष्ट्राला वाचवणं आहे. ते काम आम्ही करत आहोत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. बाकी गोष्टी हायकमांड ठरवतील. काँग्रेस, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यात कोणत्याच प्रकारचे मतभेद नसतील. या लोकांनी शरद पवारांचं कुटुंब तोडलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला. भाजपने त्यांच्यावर मोठा घाव केला आहे. मुख्यमंत्रीपदाची चर्चा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील नाही. माध्यमांमध्ये अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असंही नाना पटोले म्हणाले.
तीन पक्ष आहेत आणि काँग्रेस सर्वात जास्त जागांवर लढत आहे. काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल, असं तुम्ही सांगत आहात. मग काँग्रेसकडून मुख्यमंत्री तुम्ही व्हायला पाहिजेत? यावर प्रतिक्रिया नाना पटोले म्हणाले, आम्ही भाजपसारखे 164 लढत नाही. आम्ही 102 जागांवर लढत आहोत. महाराष्ट्रात सत्तेसाठी 145 जागा लागतात. पण आम्ही तेव्हढ्या जागा लढत नाहीत.
मग सिंगल लार्जेस्ट पार्टी कशी काय होणार. महाराष्ट्राला वाचवण्याची काँग्रेसची भूमिका आहे. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. महायुतीचे वेगवेगळे जाहीरनामे आले. आम्ही सर्वांनी मिळून जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याचसोबत गॅरंटीची घोषणाही केली. आम्ही युनायटेड आहोत. आमच्यात कोणत्याच प्रकारचं मतभेद नाही. महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत आणि आम्ही ती जिंकणार, असंही नाना पटोले म्हणाले.