
पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्वा आहे. ही तिथी गणपतीच्या पूजेसाठी समर्पित आहे.
धार्मिक मान्येतेनुसार, गणपती हे प्रथम पूजनिय देव आहे. त्यानुसार, सोमवारी म्हणजेच 18 नोव्हेंबर 2024 रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येईल. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी व्रत आणि विधीवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी नांदते. या व्रताने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. चला जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ आणि पूजाविधी.
संकष्ट चतुर्थी तिथी आणि मुहूर्त
पंचांग नुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी समाप्त होईल. मान्यत्येनुसार, संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाचे महत्त्व आहे. त्यानुसार, संकष्ट चतुर्थी 18 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग सकाळी 06 वाजून 38 मिनिटे ते दुपारी 03 वाजून 49 मिनिटांपर्यंत असेल.
संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाची वेळ
सायंकाळी 07 वाजून 45 मिनिटांनी.
संकष्ट चतुर्थीला पूजाविधी…
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करुन व्रताचा संकल्प घ्या. देवघरात स्वच्छता करुन गंगाजल शिंपडून पवित्र करा.त्यानंतर गणपती पूजनाला सुरूवात करत गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करुन फळे, फुले, अक्षता आणि दूर्वा अर्पण करा. शेवटी गणपतीची आरती करा. नैवेद्य अर्पण करुन गरजू आणि गरीबांना अन्नदान करा. यावेळी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल देवाची क्षमा मागत देवाला प्रणाम करा.
गणपती आरती..!
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥1॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥2॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥3॥