
मुंबई, पुणे, बंगळुरूत शिक्षण आणि करियरसाठी मोठ्या संख्येनं लोक राहतात, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता मुंबईहून बंगळुरूला चक्क 6 तासांत जाता येणार आहे. यासाठी नवा ‘ग्रीन एक्स्प्रेस हायवे’ बांधण्यात येईल, अशी माहिती स्वत: केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
मुलुंड येथील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ‘मुंबई ते बंगळुरूपर्यंत ग्रीन एक्स्प्रेस हायवेनं 6 तासांत जाता येईल, याबाबत महिनाभरापूर्वीच निर्णय झाला असून सुशासन आणि शास्वत विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे’, असं नितीन गडकरी म्हणाले.
आता मुंबईहून पुण्याला रस्ते मार्गानं जाण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 तास लागतात. तर पुढे पुण्याहून बंगळुरूला जायला तब्बल 14 तास 22 मिनिटांचा वेळ लागतो. या प्रवासात आता खूप वेळ वाचणार आहे. जवळपास महिनाभरापूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते. तिथल्या दहिवडी-मायणी-विटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-160 या रस्त्याची सुधारणा आणि काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळी बोलतानाही त्यांनी या मार्गाबाबत माहिती दिली होती.
मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की, मुंबईच्या अटल ब्रीजवरून खाली उतरल्यानंतर मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर असा नवा महामार्ग लवकरच होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, बेळगाव असा हा मार्ग असेल. त्याचं 307 किलोमीटर अंतर महाराष्ट्रातून आणि 493 किलोमीटर अंतर कर्नाटकातून जाईल. या महामार्गामुळे मुंबईहून पुण्याला दीड तासात पोहोचता येईल, तिथून पुढे बंगळुरूला साडेचार ते 5 तासांत जाणं शक्य होईल. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 60 हजार कोटींचा हा नवा द्रुतगती मार्ग असणार आहे.