
शिवसेना फूटल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना गटांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. भविष्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये एकता होईल का, यावर चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.एका विशेष मुलाखतीत शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि विचारधारा घेऊन पुढे जात आहोत.
शिवसेनेची काँग्रेससोबत आघाडी आम्हाला मान्य नव्हती. बाळासाहेबांचे शिवसेना काँग्रेसशी कधीही जुळवाजुळव करणार नाही, असे स्पष्ट मत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणे हे राज्याला अधोगतीकडे नेणारे ठरले. त्यामुळे आम्ही वेगळा मार्ग निवडला.
शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही २०२२ साली लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. त्यानंतरच्या दोन वर्षांत आम्ही अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे ‘जर-तर’च्या चर्चांना काहीही अर्थ नाही. शिवसेना-भाजपाची विचारधारा गेल्या २५ वर्षांपासून समान आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका वेगळी आहे.
अजित पवार गटाच्या भवितव्याबाबत तसेच अजित पवार निकालानंतर पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जातील काय या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपण आता असा विचार का करायचा. शेवटी प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी असते. राष्ट्रवादीचा एक गट आमच्यासोबत आहे कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलवर विश्वास ठेवला आहे.राज्याचा विकास बघून ते आमच्यासोबत आले आहेत. आमची आणि त्यांची एक पॉलिटीकल अलायन्स आहे.राजकीय चर्चांना उत्तर देताना शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत स्पष्ट केले की, आमची दिशा ठरलेली आहे आणि ती बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी निष्ठा ठेवणारी आहे.