
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. बारामतीच्या विधानसभा निवडणुकीकडे राज्याचच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगत आहे.
अजित पवारांविरोधात त्यांचेच सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शरद पवार यांनी बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी सांगता सभा घेतली. या सभेत शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना का निवडून द्या? याचं कारण बारामतीकरांना सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना पाडा पाडा पाडा, असं आवाहन केलं, पण बारामतीच्या सांगता सभेत शरद पवारांनी अजितदादांना पाडा पाडा पाडा, असं आवाहन केलं नाही. अजितदादांना सिम्पथी मिळू नये, म्हणून शरद पवारांना बारामतीत त्यांना ‘पाडा पाडा पाडा’ असं वक्तव्य करणं टाळलं का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, 1967 साली तुमच्यातल्या लोकांनी मला आमदार केलं. पुढे मी मंत्री झालो, पक्षाने संधी दिल्यावर मी मुख्यमंत्री झालो. राजकारणात नवी पिढी आली पाहिजे. मी अजितदादांना संधी दिली. तीनदा उपमुख्यमंत्री केलं, त्यांनीही काम केलं. माझी काही तक्रार नाही, पण पुढे काय करायचे? माझी पिढी, माझ्यानंतरची पिढी (अजित पवार) आणि त्यानंतर पुढची पिढी (युगेंद्र पवार) यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. बारामतीचे समाजकारण, अर्थकारण सांभाळण्याची जबाबदारी पुढच्या पिढीच्या हाती द्यायला हवी, असे माझे मत आहे. गावो गावी फिरून लोकांशी युगेंद्रने संपर्क ठेवला आहे. बारामतीचा नावलौकिक देशात आहे. बारामतीचा नाव काढलं की ते शरद पवार यांचे नाव घेतात. ही परंपरा पुन्हा चालू ठेवायची असेल तर यासाठी पुढची पिढी कर्तबगार, ज्ञानी पिढी गरजेची आहे. त्याच दृष्टीने युगेंद्रला उमेदवारी दिली. बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही पाच पन्नास वर्षे काम केले. आता नव्या पिढीला संधी द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे युगेंद्रला उद्याच्या निवडणुकीत मोठ्या मतांनी निवडून द्या, असे आवाहन पवार यांनी केले.
पुढच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून युगेंद्रला उभा केलंय. त्याने अमेरिकेत शिक्षण घेतलंय. तिकडून आल्यानंतर ऊसाच्या शेतीकडे आणि त्यावर आधारित उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले. लोकांच्यासाठी काम करतोय. विद्या प्रतिष्ठानच्या अर्थकारणाचे काम युगेंद्र पाहत आहे. चांगले काम करतोय, विविध क्षेत्राची त्याला जाण आहे. ज्ञानी व्यक्ती विधानसभेत पाठवण्याचे काम करा, असे पवार म्हणाले.